केळवारोड दि. १४ जून २०२०
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ती कमी भरुन काढण्यासाठी छोटासा हातभार म्हणून आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून केळवारोड गाव परिसरातील ९४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था,केळवारोड परिसर कृती समिती व नवसंजिवनी आरोग्य सेवा संस्था ह्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामपंचायत वाकसई व ग्रामपंचायत मायखोप ह्यांच्या सहाय्याने हे रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. रक्त संकलन करण्यासाठी सेंट जाँर्जेस हाँस्पिटल, मुंबई ची प्रशिक्षित टिम हजर होती. क्लासिक केअर फाउंडेशन (सेव्हलाईव्ह) ह्यांच्यातर्फे प्रत्येक रक्त दात्याला सँनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले व अल्पोपहाराची सोय करण्यात आली. तसेच आयोजकांकडून प्रत्येक रक्तदात्याला एक रोपटे देऊन वृक्षारोपणाचा संदेशही देण्यात आला. त्याआधी सकाळी केळवारोड- वाकसई ग्रामपंचायतचे सरपंच श्री. उपेश घरत, मायखोप ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.चेतन गावड व डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सचिव श्री.दयानंद पाटिल ह्यांच्या हस्ते फित कापून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर रक्तदानासाठी दात्यांची रीघ लागली.
आवाहनाला प्रतिसाद म्हणून परिसरातील मंडळे,क्रीडामंडळे , गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालयातील कर्मचारी व शिक्षक तसेच सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, गावातील नागरिक,आणि स्वयंसेवक ह्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
महावितरण चे कर्मचारी, पोलिस जवान, पत्रकार बंधू तसेच सरकारी अधिकारी ह्यांनी रक्तदानात प्रत्यक्ष भाग घेतला आणि रक्तदान केले.ह्या प्रसंगी आगरवाडी मंडळ अधिकारी श्री. राजेश पाटील ,व श्री वैभव सातपुते – सफाळे पोलीस स्टेशन ( केळवारोड बीट) ह्यांनी रक्तदान करुन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. प्राथमिक आरोग्य केंद्र माहिमच्या वैद्यकीय आधिकारी डाँ. कल्पना मावची,आरोग्य धाम केळवारोडच्या डाँ.आकांक्षा चुरी ह्यांनी आवर्जून भेट दिली. गावातील वैद्यकिय शिक्षण घेतलेल्या डाँ. श्वेता किणी व अंकिता पाटिल ह्यांनी शिबिरात पुर्णवेळ स्वयंसेवकांची भुमिका बजावली
रक्तदात्यांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या
सर्व कार्यकारिणी सदस्य व सभासदांनी रक्तदात्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *