
विरार(प्रतिनिधी): वसई-विरार महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता विरार-चंदनसार येथील एचडीआयएल इंडस्ट्रीत विलगीकरण केंद्र तयार करा, अशी मागणी शिवसेना पालघर उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकड़े केली आहे.
एचडीआयएल इंडस्ट्रीत विलगीकरण केंद्र तयार केल्यास विरार महामार्ग परिसरातून रुग्ण आल्यास या ठिकाणी त्यांची सोय करणे सुलभ पडेल, असे तेंडोलकर यांचे म्हणणे आहे. या इंडस्ट्रीत विलगीकरण केंद्र झाल्यास किमान दोन हजारपेक्षा जास्त लोकांची सोय होऊ शकते.
शिवाय या लाखो चौरस फुटांच्या इंडस्ट्रीत १५ ते २० पेक्षा जास्त इमारती तयार असून;.या इमारतींत कोणतेही काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे या इंडस्ट्रीत विलगीकरण केंद्र सुरू केल्यास सोईस्कर पडेल, सोबतच प्रवेशद्वारावर सुसज्ज कार्यालय असल्याने या ठिकाणी कोविड-१९ची लैबही तयार करता येईल, असे तेंडोलकर यांचे म्हणणे आहे.
दरम्यान; वसईतील जी. जी. कॉलेजमधील विलगीकरण केंद्रातील रुग्ण क्षमता संपली आहे. शहराची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता वसईतील वरुण इंडस्ट्रीत विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येत असले तरी; एचडीआयएल इंडस्ट्रीचाही विलगीकरण केंद्राचासाठी प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती निलेश तेंडोलकर यांनी आयुक्त गंगाथरन ड़ी. यांना केली आहे.