

वैतरणा दि. २२ जून, २०२०. कोवीड १९ च्या प्रसारामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरुन काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलेला आवाहनाला प्रतिसाद डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था वैतरणा स्टेशन कमिटी मार्फत संस्थेचे सदस्य व वैतरणा विभाग शिवसेना विभाग प्रमुख श्री. नरेंद्र पाटील ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन तसेच सर्व साहित्य वेळोवेळी निर्जंतुक करुन रक्तदात्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती.
प्रत्येक रक्तदात्याला एक छोटीशी भेट म्हणून एक रोपटे, प्रशस्तीपत्र , व एक अर्सेनिक अल्बम -३० ह्या रोगप्रतिकार शक्ती वाढवणार्या गोळ्यांची डबी देण्यात आली. रोपटे भेट देऊन आयोजकांनी रक्तदाना सोबतच वृक्षारोपणाचा संदेशही दिला.
वैतरणा विभागातील कसराळी ह्या छोट्याशा गावातील संत निरंकारी सत्संग भवनच्या सभागृहात हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. साथिया ट्रस्ट च्या रक्तपेढीतील चमू ने रक्त संकलनाचे काम केले. गावातील अनेक नागरिकांनी ह्या प्रसंगी स्वेच्छेने रक्तदान केले. ह्या प्रसंगी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वैतरणा स्टेशन कमिटीच्या सर्व सदस्यांनी रक्तदान तर केलेच पण आयोजनात महत्वाची भूमिका ही बजावली.
