प्रत्येक महावितरण कार्यालयाबाहेर आणि शहरात फलक लावून सामाजिक कार्यकर्ते चरण भट जनजागृती करणार

 

विरार( – संजय राणे) : कोविड-१९ संक्रमणाचा ताप कमी होत नाही; तोच महावितरणने वीज ग्राहकांना तब्बल तीन महिन्यांनंतर भलेमोठे ‘वीजबिल’ देऊन मानसिक धक्का दिला आहे. महावितरणचा हा ‘वीजबिल घोटाळा’ वसईतील सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी निदर्शनास आणला असून; ‘वीजबिल युनिट’मधील या ‘हातचलाखी’विरोधात प्रत्येक महावितरण कार्यालयाबाहेर फलक लावून जनजागृती करणार असल्याची माहिती भट यांनी दिली.

ग्राहकांच्या वीज वापरानुसार महावितरण वीजबिल दर आकारते. या करता महावितरणने प्रति युनिट वीज दर ठरवले आहेत. यासाठी युनिटचे ‘स्लैब’ ठरवून देण्यात आले आहेत.

१ एप्रिल २०२०च्या नवीन वीज दराप्रमाणे घरगुती वापरासाठी ० ते १०० युनिटदरम्यान वीज वापरल्यास प्रति युनिट ३.४६ पैसे इतका दर आकारला जातो. तर १०० ते ३०० युनिटसाठी प्रति युनिट ७.४३ पैसे इतका दर आहे.

३०० ते ५०० युनिटदरम्यान वीज वापरल्यास प्रति युनिट १०.३२ पैसे महावितरण दर आकारते. यापुढे म्हणजे ५०० ते १००० व १००० पुढे वीज वापर झाल्यास प्रति युनिट ११.७१ पैसे इतका दर आकारला जातो.

मात्र कोविड-१९मुळे २२ मार्चपासून लॉकड़ाउन सुरू झाल्याने महावितरणकडून जूनपर्यंत ग्राहकांच्या वीज मीटरची रीडिंग घेण्यात आली नव्हती; मात्र जूनमध्ये थेट तीन महिन्यांचे अवाढ़व्य वीजबिल देऊन महावितणने ग्राहकांना घाम फोड़ला.

या बिलात महावितणने तीन महिन्यांच्या एकत्रित युनिटचा दर आकारला. त्यामुळे प्रत्येक ग्राहक मोठ्या स्लैबमध्ये गेला.

महावितरणे प्रत्येक महिन्याला रीडिंग घ्यायला हवी होती. मात्र कोविड-१९चे कारण देत महावितणने ही मीटर रीडिंग घेतली नाही. त्यामुळे जो ग्राहक ०-१०० इतकी युनिट वीज वापरून प्रति युनिट ३.४६ पैसे प्रति युनिट बिल भरत होता; त्याला तीन महिन्यांनंतर ६०० युनिटचे बिल देऊन प्रति युनिट १०.३२ पैसे दर आकारला गेला. परिणामी या ग्राहकाला प्रति युनिट ६.८६ पैशांचा फुकटचा भुर्दड पडला. याशिवाय महापालिका क्षेत्रात कोविड-१९ साठी प्रति महिना १० रुपये बिलात अधिभार लावला गेला, असे भट यांचे म्हणणे आहे.

अशीच स्थिती इतर ग्राहकांसोबत झाली आहे. हे केवळ घरगुती वीज वापराबाबतचे उदाहरण आहे. व्यावसायिक व इंडस्ट्रियल वीज वापराबाबतही अशीच स्थिती असू शकते. त्यामुळे हा ‘वीजबिल’ घोटाळा कोट्यवधी रुपयांच्या घरांत असू शकतो, असे चरण भट यांचे म्हणणे आहे.

दरम्यान; ग्राहकांना सध्या तीन महिन्याच्या आकारलेल्या वीजबिलातील एकूण युनिटचा भागाकार करावा व प्रति महिन्याच्या युनिटप्रमाणे वीजबिल आकारावे. यामुळे हे ग्राहक त्यांच्या मूळ स्लैबमध्ये येतील, असे चरण भट यांचे म्हणणे आहे.
तसे पत्र चरण भट यांनी वसई सर्कलचे मुख्य अधिकारी, कल्याणचे विभागीय अधिकारी व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना लिहिले आहे.

महावितरण कार्यालयाबाहेर फलक लावून जनजागृती करणार – चरण भट

वीज मंडळाचे कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत होते; त्यानंतरही ग्राहकांच्या मीटरची रीडिंग न घेता; ग्राहकांची जाणीवपूर्वक लूटमार करण्यात आली आहे.
हे लक्षात आणून देण्यासाठी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयाबाहेर फलक लावून जनजागृती करणार आहोत. याद्वारे महावितरणने युनिट वापरात घातलेला घोळ लक्षात आणून ग्राहकांना बिल न भरण्याचे आवाहन करणार असल्याचे चरण भट यांनी सांगितले.

यानंतरही वीज ग्राहकांना बिलकपात करून महावितरणने दिलासा न दिल्यास या घोटाळ्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे चरण भट यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *