टाळेबंदीत सर्वसामान्य नागरिकांची अन्नासाठी परवड

विरार : जून महिना संपायला अवघा आठवडा शिल्लक असताना तालुक्यातील सुमारे 22 रेशनिंग दुकानांत धान्याचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धान्यावाचून नागरिकांचे अक्षरक्ष: हाल होत असून वसईच्या पुरवठा विभागाच्या निष्काळजी कारभारावर नागरिक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

येत्या दोन ते तीन दिवसांत धान्याची निकड भागवली जाईल, असे समजत असले सध्या धान्यामुळे परवड होत असलेल्या नागरिकांची रेशनिंग दुकानांत धान्य येताच ते घेण्यासाठी एकच झुंबड उडणार आहे. साहजिकच त्यामुळे सोशल डिस्टनशिंगसारखे नियम पायदळी तुडवले जाणार आहेत. हा धोका पुरवठा विभागाने अगोदरच ओळखून धान्य पुरवठ्याबाबत योग्य नियोजन आखणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत कोव्हीड-19 हा साथरोग झपाट्याने वाढू लागला आहे. रविवारपर्यंत (दि.21 जून) एकट्या महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 2071 वर पोहोचला आहे. तर 86 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा भयंकर असतानाच येणार्‍या काळात हा आजार आणखी वेगाने पसरण्याची भिती व्यक्त होत आहे.

आधीच तीन महिन्यांपासून टाळेबंदीत अडकून पडलेल्या नागरिकांची अन्नपाण्यावाचून अक्षरश: दैना सुरू झाली आहे. त्यात तालुक्यातील 22 रेशनिंग दुकानांत धान्याचा तुटवडा जाणवू लागल्याने नागरिकांची परवड सुरू झालीय. सध्या वसई तालुक्यात 150 रेशनिंगची दुकाने आहेत.

त्यापैकी 22 रेशनिंग दुकानांत जून महिना संपायला आठवडा शिल्लक असतानाही धान्य पुरवठा झालेला नाही. त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. वसई पुरवठा विभागाचे पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांनी याप्रश्‍नी तातडीने लक्ष देऊन टाळेबंदीत गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत म्हणून, तात्काळ धान्य पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *