

पालघर दि.25 : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता आज एका दिवसात कोव्हिड-19 पॉझिटिव्ह 74 रूग्ण उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून आज घरी सोडण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल रेवेरा ता.विक्रमगड येथिल रूग्णांना जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. विक्रमगड तालुक्यातील डोलारे येथिल 14 रूग्ण, डहाणू येथिल 11 रूग्ण मोखाडा येथिल 06 रूग्ण जव्हार येथिल 26 रूग्ण डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल रेवेरा येथे उपचार घेत होते. तसेच आयडियल हॉस्पिटल, पोशेरे ता. वाडा येथिल 17 रूग्ण असे एकुण 74 रूग्ण आज घरी सोडण्यात आले आहेत. कोव्हिड-19 रूग्ण बरे होऊन घरी परतण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होणार असल्याचा सकारात्मक विश्वास जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केला.
या कोरोना बाधित रूग्णावर उपचार करणारे डॉ. प्रशांत राजगुरू, डॉ. गजानन सानप, तसेच रूग्णालयातील परिचारिका व कर्मचारी यांचे अभिनंदन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे, वाडा प्रांत अधिकारी अर्चना कदम, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.कांचन वानेरे आदि उपस्थित होते.