

◆ साफ सफाईचे ही तीनतेरा ?
◆ महापालिकेला करोना रोखण्यास सपशेल अपयश ?
वसई (डॉ अरुण घायवट) — वसई तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे . वसई विरार महानगर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या वसईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पालिकेने उभारलेल्या कोविड सेंटर मध्ये कोणाचाही कंट्रोल नाही. कोविड सेंटर मध्ये रुग्णाकडे कोणीही लक्ष देत नाही त्यांची तपासणी होत नाही की औषध उपचार देखील केला जात नाही. उलट रुग्णांना मानसिक त्रासा मुळे त्यांचा आजार वाढू लागला आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचा आकडा रोजच वाढत चालला आहे. पालिकेने कोविड रूग्णासाठी जी जी कॉलेज चा वापर केला आहे मात्र या ठिकाणी कोविड रुग्णाची मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे. भीक नको पण कुत्रं आवर अशी परिस्थिती आहे. कोविड रुग्णासाठी त्यांच्या नाते संबधिनी आणलेले पार्सल चोरीला जाण्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत आपलं पार्सल कुठे गेले अशी विचारणां कोणाला करावी, तक्रार कुठें करावी याची कोणतीच सोय येथे नाही. चोरांना आळा घालण्यासाठी येथे कोणतीही यंत्रणा पालिकेने केलेली नाही . या सेंटर वर कोणीही जबाबदार अधिकारी दिसून येत नाही . स्वच्छता नाही टॉयलेट बाथरूम मध्यें दुर्गंधी पसरली आहे हा आजार संसर्ग जन्य असल्याने अशा ठिकाणी स्वच्छता आवश्यक असते मात्र कोणीही अधिकारी येथे पाहणी करण्यासाठी येत नसल्याने कर्मचाऱ्यांचे फावले आहे. येथील कोविड रुग्ण अक्षरशः नरक यातना भोगत आहेत. करोनाची लागण झालेले रुग्ण प्रथम उपचारासाठी येथे आणले जातात मात्र येथील भयावह परिस्थिती बघून रुग्ण बरा होण्यापेक्षा अधिक आजारी होत असल्याचे दिसून येत आहे आजार वाढला की त्यांना नालासोपारा येथील खाजगी रिद्धीसिधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जातात तेथे रुग्णाकडून लाखो रुपये उकळले जातात असा गोरख धंदा येथे मांडलेला आहे. मयताच्या टाळू वरील लोणी खाण्याचा प्रकार येथे सुरू आहे. सध्या पालिकेत नवनिर्वाचित आयुक्त दाखल झाले असून ते कडक शिस्तीचे असल्याचे बोलले जात आहे. मात्र या सेंटर मध्ये इतका ढिसाळ कारभार असतानाही आयुक्तांनी कारवाई चा दंडुका अद्याप का उगारला नाही असा संतप्त सवाल विचारला जात आहे . येथील आमदार, खासदार आणि महापौर देखील मौनी झालेत. अशीच परिस्थिती राहिल्यास वसईची अमेरिका अथवा इटली सारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार नाही. तूर्तास तरी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान आणि भ्रष्ट कारभारावर येथील करदाते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. निष्काळजी करणाऱ्या आणि या आजाराचा जाणीव पूर्वक फौलाव करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी होत आहे.