
◆ आत्तापर्यंत वसई महसूल विभागातील 7 कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण!
◆ अधिकारी-कर्मचार्यांनाच लागण होत असेल तर त्यांच्या सुरक्षेचं काय?
◆ फ्रन्ट लाईनवर काम करणार्या कर्मचार्यांना अधिक सुरक्षेची गरज !
वसई : (प्रतिनिधी) : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून या विळख्यातून वसई विरार महापालिका व महसूल प्रशासनातील कर्मचारीदेखील सुटू शकलेले नाहीत. कोरोनासारख्या आपत्ती काळात फ्रन्ट लाईनवर काम करणारे वैद्यकीय कर्मचारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन काळाचा धैर्याने सामना करणार्या महापालिका व महसूल कर्मचार्यांना आता या आजाराने विळखा घातला आहे. आत्तापर्यंत महसूल विभागातील 7 कर्मचार्यांना कर्तव्य बजावत असताना या विषाणुने विळखा घातला असून वसई विरार शहर महापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाने ग्रासले आहे. वसई विरारमधील कोव्हीड संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. नागरिकांनी खबरदारी आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्यास कोरोनाला आला घालण्यास सोपे जाईल, असे प्रशासकीय पातळीवरून आवाहन करण्यात आले आहे.
साधारणत: 25 मार्च 2020 नंतर वसई तालुक्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी व्यवसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. कडक निर्बंध लादल्यानंतर वसई विरारमधील कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले होते. मात्र एप्रिल महिन्यात पहिला कोरोना विषाणू वसईच्या एव्हरशाईन परिसरात आढळून आला. त्यानंतरही काही दिवस कोरोनाचा संसर्ग रोखून धरण्यात महापालिका व महसूल विभाग प्रशासनाने पुरेपुर भुमिका बजावली होती. मात्र जून महिन्यात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर वसई विरारमधील रूग्णांची आकडेवारी मोठ्या वेगाने वाढली. परिस्थिती हाताबाहेर जाण्यामागे लॉकडाऊन शिथील करण्याचे एकमेव कारण आहे. मध्यंतरी वसईतून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे कर्मचारी कोरोनाचे प्रमुख वाहक होते. या सर्व काळात शासकीय पातळीवर योग्य नियोजन नसल्याने वसईत कोरोना फोफावला. वसईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करूनही अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांचा मुद्दा अधांतरीच राहीला होता. वसई विरारची लोकसंख्या 20 लाखांच्या घरात पोहोचलीय. सुरूवातीच्या काळात अवाढव्या लोकसंख्येच्या या प्रदेशात नागरिकांनी कोरोनाचे गांभिर्य मनावर न घेतल्यानेदेखील कोरोनाचा संसर्ग वाढला. हेदेखील कोरोनाचा फैलाव करण्यास प्रमुख कारण ठरले. कोरोनाचा फैलाव होत असताना परप्रांतीय नागरिकांना श्रमिक टे्रनच्या माध्यमातून गावी सोडण्याचे काम शासनाने हाती घेतले होते. त्यामुळे बरेचसे परप्रांतीय आपल्या गावी परतले आहेत. येथील कोरोनाग्रस्तांचा आकडा जून महिन्यानंतर अचानक वाढल्याने नागरिक भितीच्या छायेखाली आहेत. वसई विरार महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाने विळखा घातल्याने आपत्ती काळाशी लढण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू लागला आहे. फ्रन्ट लाईनवर काम करणार्या कर्मचार्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेत काम करणार्या स्वच्छता कर्मचार्यांना अद्यापही पुरेशी सुरक्षेची साधने नसल्याने त्यांच्या सुरक्षेचे काय? हा मुद्दा आधीपासूनच समोर आहे.
महसूल विभागातील कर्मचारीदेखील आपत्ती व्यवस्थापन काळाशी केव्हापासूनच दोन हात करत आहेत. या आजाराच्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी या विभागातील अधिकारी, कर्मचारी स्वत: तहसिलदार किरण सुरवसे कार्यरत आहेत. महसूल विभागातील 7 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतरदेखील अधिकारी व कर्मचारी आपत्ती काळात आपले कर्तव्य बजावत आहेत. महापालिका प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेवर रूग्णवाढीनंतर मोठा ताण आलाय. अशात वैद्यकीय कर्मचार्यांनाही कोरोनाचा धोका संभवतो. याआधी बर्याचशा वैद्यकीय कर्मचार्यांना कोरोनाची लागण होऊन ते या आजारातून बरे होऊन पुन्हा कामावर परतले आहेत. सध्या कोरोनाचा आकडा वाढतोय. रूग्णालयांवर प्रचंड ताण आहे. खाजगी रूग्णालयांतदेखील रूग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. अशा काळात कोरोनाशी दोन हात करणार्या महापालिका व महसूल विभागातील कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठीदेखील शासकीय पातळीवर ठोस प्रयत्न होणे गरजेचे आहेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.