
सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांच्या पाठपुराव्याला यश ?

प्रतिनिधी
विरार : वसई-विरार महापालिकेला ‘कोविड-१९’ची चाचणी घेण्यासाठी अखेर अनुमती मिळाली आहे. त्यामुळे यापुढे मुंबईत होणाऱ्या कोरोना चाचणी आता वसईतील अगरवाल रुग्णालयातील आयसोलेशन सेंटरमध्ये होतील.
वसईत कोरोना चाचणी व्हाव्यात, यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय मानव अधिकार आयोगाकड़े वसईतील सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी धाव घेतली होती.
या तक्रारीची दखल घेऊन भारत सरकारच्या मानवाधिकार आयोगाच्या विधी विभागाचे सहाय्यक रजिस्टार डैनी शर्मा यांनी; राज्याच्या मुख्य सचिवांना ३ जुलै रोजी पत्र पाठवून याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी व मानव अधिकार कार्यालय आणि तक्रारदाराला आठवड़ाभरात कळवावे, असे निर्देश दिले होते.
त्यानुसार, नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने ६ जुलै रोजी वसई-विरार महापालिकेला पत्र पाठवून वसईतील अगरवाल हॉस्पिटलमधील आयसोलेशन सेंटरमध्ये कोरोना चाचणी घेण्याबाबत अनुमती दिली आहे.
कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव पाहता वसई-विरार शहरात सरकारी कोरोना चाचणी लैब हवी, अशा मागणीचे पत्र चरण भट यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनाही त्याआधी पाठवले होते.
हा विषय कोविड-१९ महामारीसंदर्भातील असल्याने यावर योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. शिवाय ही तक्रार राज्याच्या नगरविकास आणि आरोग्य विभागाशी संबंधित असल्याने यावर उचित कार्यवाही करावी; असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी २५ एप्रिल रोजी या पत्राला उत्तर देताना दिले होते.
त्यानुसार २८ एप्रिल रोजी राज्याच्या मुख्य सचिवांनी पत्राद्वारे वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांना यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले होते.
हे पत्र मिळताच आयुक्त गंगाथरन डी. यांनी संबंधित विभागाकड़े तात्काळ कार्यवाहीसाठी हे पत्र पाठवल्याचे चरण भट यांना ५ मे रोजी कळवले होते. मात्र दोन महिने उलटले तरी आयुक्त गंगाथरन डी. यांनी कोरोना चाचणी लैब होण्यासाठी कोणतीही पावले उचलली नव्हती.
त्यामुळे चरण भट यांनी; पुन्हा एकदा भारत सरकारच्या केंद्रीय मानव अधिकार आयोगाकडे धाव घेऊन वसई-विरार पालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना चाचणी लैबची असलेली गरज व्यक्त केली होती.