
समाजकंटकावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा ! -सुनिल सकट

अहमदनगर(प्रतिनिधी)- देशाची धरोवर असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर हल्ला करणार्या समाजकंटकावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दीन, दलितांचे व बहुजनांचे उद्धारक होते. त्यांची दादर येथील जगविख्यात वास्तू राजगृहाची काही समाजकंटकांनी नासधूस करण्याचा प्रयत्न केला. ही वास्तू राष्ट्रीय संपत्ती असून, सदर घटना मानवतेला कलंक लावणारी आहे. या घटनेने समस्त आंबेडकरी जनता व प्रत्येक भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेतील आरोपींचा तपास करून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.