
पर्यावरणाविषयी सद्या मी एक चांगले पुस्तक वाचतो आहे.Envoironmentalism असे या पुस्तकाचे नाव आहे.पर्यावरणवाद असे आपण या पुस्तकाच्या शिर्षकाचे वर्णन करुया.हे पुस्तक रामचंद्र गुहा यांनी लिहिले आहे. त्यांचे नाव वाचुन काहींच्या कपाळाला आठ्या पडतात.चालेल.जागतिक दर्जाचा एक संशोधक,मानवतावादी,ईतिहासकार,पर्यावरणवादी अशी त्यांची ओळख असुनही काहीजण त्यांना नाके मुरडतात. हे पुस्तक मनापासुन वाचले तर नाक मुरडणार्यांचे गैरसमज दुर होण्यास मदत होईल.
आपल्याला वाटतं पर्यावरणाबाबत माणुस अलीकडे जागरुक झाला असावा.आपण गेली चाळीस वर्ष सातत्याने हा शब्द ऐकतो.त्या अगोदर असा शब्द शब्दकोशांत होता का याबाबत अनेकजण साशंक असावेत.प्रत्यक्षात पर्यावरण दोनशे वर्षांपासुन तत्वचिंतकांचा गहन चिंतनाचा विषय होता.औद्योगिक क्रांतीला या विचारवंतांचा सुरवातीपासुन विरोध होता.महाकवी वर्डस्वर्थ आठवतो का?हा निसर्गकवी दोनशे वर्षांपुर्वी औद्योगिक क्रांतीला विरोध करीत ईंग्लंडभर पायपीट करीत होता.त्याच्या हयातीत तो १७५००० मैल चालला.ईंग्लंडमध्ये लेक डिस्ट्रिक्ट नावाचा भुप्रदेश आहे.अनेक सरोवरांनी भरलेल्या या प्रदेशांत ब्रिटीश सरकारने रेल्वे चालु करण्याच्या योजना आखल्या.वडस्वर्थ यांनी त्याला जीव तोडुन विरोध केला.तेव्हापासुन पर्यावरण वाचवण्यासाठी लढाया चालु आहेत.वर्डस्वर्थपासुन पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक महात्म्यांची जी श्रुंखला चालु झाली ती आजतागायत चालु आहे.आपले महात्मा गांधी या परपंरेतील एक सर्वश्रेष्ठ दुवा आहेत.विल्यम वर्डस्वर्थ,जाँन क्लेअर,चार्ल्सस् डार्विन,जाँन रस्किन,विल्यम माँरिस,जेन मार्श,एडवर्ड कारपेन्टर,गिल्बर्ट व्हाईट,आँक्टिव्हिया हिल,रेनर मारिया,विल्यम हेनरिच,क्नुट हँमसन,आपल्याकडील सुंदरलाल बहुगुणा,मेधा पाटकर ही काही नावे या परंपरेतील शिरोमणी आहेत.त्यांना आधुनिक संत समजले पाहिजे.
आपणा सगळ्यांना पर्यावरण वाचावे असे वाटते.प्रत्यक्षात मात्र आपली पावले पर्यावरणाच्या र्हासाच्या दिशेने वळतात.त्यात स्वतःला निसर्गप्रेमी म्हणविणारे देखील येतात.आधुनिक साधनसामुग्रीची आणि सुखसोईंची आपल्याला ईतकी चटक लागलेली आहे की आपल्या हातुन निसर्गाची हानी होते हे आपल्याला समजत देखील नाही.आजच्या मानाने दोनशे वर्षापुर्वी औद्योगिक प्रगती ती काय असणार?अतिशय नगण्य.तरीदेखील त्यावेळच्या पर्यावरणप्रेमींनी त्या प्रगतीचा धिक्कार केला होता.त्यांच्यापैकी एकाने त्याला पडलेल्या स्वप्नाविषयी लिहिले आहे.जंगलातील एका पहाडाच्या टोकावर त्याचे भ्रमण चालु होते.तेथुन त्याला दुरवर मानवीवस्तीच्यावर एक प्रचंड आकाराचा ढग आकाशाकडे चाललेला दिसला.त्या अजस्त्र ढगाचे दर्शन घेऊन तो थक्क झाला. देवाला धुपवहन करायला माणसांनी जणु हा ढग आकाशात पाठवलाआहे असा त्याला भास झाला. मोठ्या कुतुहलाने त्याने नजर खाली वळवली.तेथे त्याने जे पाहिले त्याने तो भयचकित झाला.खाली त्याला मोठा होमार्पण चालल्याचे आढळुन आले.या होमहवनामध्ये लाखो माणसांच्या आहुत्या वाहण्याचे काम चालु आहे असे त्याने पाहिले.ते द्रुष्य पाहुन तो हादरून गेला.या प्रचंड ढगाचे रहस्य त्याला उलगडले.औद्योगिक क्रांतीने हे बळी अर्पण चालवले होते.
वरील स्वप्न त्या निसर्गप्रेमीने दिडशे वर्षाअगोदर पाहिले.आजच्या तुलनेने तेव्हा माणसाने निसर्गाची नगण्य हानी केली होती.आजच्या निसर्गप्रेमीला जर स्वप्न पडले तर त्याला तो ढग दिसणार नाही.बेचिराख झालेली प्रुथ्वी त्याच्या नजरेला पडेल.आधुनिक माणसाने निसर्गाचा हा असा बट्ट्याबोळ केलेला आहे.त्याला आपण सर्व जबाबदार असल्याचे मानुन यापुढे काही पावले उचलली पाहिजेत. त्यामुळे प्रुथ्वीचा विनाश थोडाफार तरी लांब ढकलण्यास आपण यशस्वी होऊ. त्यासाठी मोठ्या त्यागाची गरज आहे.हा त्याग करण्यास आपण तयार आहोत का याचे उत्तर शोधण्यासाठी हा लेखनप्रपंच.
पहिल्याप्रथम आपण मान्य केले पाहिजे की आपण संतांना फक्त मानतो.ते देखील निर्वाणानंतर.आपण त्यांचे अनुकरण करीत नाहीत.त्यांच्या उपदेशाप्रमाणे आचरण करीत नाहीत.त्यांच्या चळवळीत सामिल होत नाहीत.उलट बहकुन आपण त्यांच्या प्रत्येक क्रुतीला जाणताअजाणता विरोध करीत राहतो.शत्रुपक्ष आपला मानतो.उदाहरण म्हणुन सांगतो.मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलन उभारले.नर्मदा नदीवर अजस्त्र धरण उभारुन कुणाचे भले होणार नाही हा धोका त्यांनी वर्तवला.या धरणाच्या पाणसाठ्यामुळे तेथील वनसंपत्तीचा र्हास होईल.भारतीय पर्यावरणावर विनाशकारी परिणाम होईल.तेथील मुल निवासी नागरिक देशोधडीला लागतील.गरीब अधिक गरीब होत जातील हे मेधाताईंनी घसा खरवडुन सांगितले.प्रसंगी आंदोलने केली.उपोषणे केली.बर्याच वेळा जेलवार्या केल्या.त्यावेळी कोण त्यांच्या सोबत होते?एकीकडे निसर्गावर आमचे प्रेम आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे मेधाताईंना कुत्सितपणे हासायचे व्यवस्थित चालु होते.राजकारण्यांची री ओढण्यात सर्व धन्यता मानत होते.अगदी सर्वोच्च न्यायालय देखील राज्यकर्त्यांची री ओढत होते. नर्मदा सरोवराची उंची १५०मिटर ईतकी उंच वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.तेथला मुलनिवासी देशोधडीला लागला.त्यावेळी आपण सारे काय करत होतो? त्याबाबतच्या चाळीस वर्षांच्या ईतिहासाची माहिती तपासा.मेधाताई जणु जनताद्रोही आहेत असे मानुन आपण राजकारण्यांच्या हो मध्ये हो मिळवत होतो.काय झाले त्या नर्मदा सरोवरामुळे?सगळ्या पर्यावरणाची वाताहात झाली.सन २०००पासुन आपण ऋतुचक्र बदलल्याचे पाहतो.ढगफुटी पाहतो.पावसाच्या पाण्याने केलेली दैना पाहतो.पुर पाहतो.दुष्काळ पाहतो.आतातर आपल्याला ठाऊक नसणारी घोंघावणारी वादळे पाहतो.नशिब या कोरोनाच्या काळात हे वादळ आपल्याला नुसते स्पर्शुन गेले.अन्यथा बघायला एक झाड राहिले नसते.भविष्यात त्याची शाश्वती देता येत नाही.आपण कसे निसर्गविरोधी वागतो याचे एक उदाहरण आपल्यासमोर मांडले आहे.तशी असंख्य उदाहरणे आहेत.निसर्गाला आपण पुरते ओरबडुन काढले आहे.कोरोना तरी कसा उत्पन्न झाला?शेकडो हजारो वर्षे जी खाणखनिजे,गौणखनिजे,घाण जमीनीखाली दफन होती ती सारी आपण वर आणली.त्यांच्या ढिगार्यांनी प्रुथ्वी व्यापली.याचा अर्थ जमीनीखाली जे अतिघातक जिवजंतु दडपुन पडले होते त्यांना आपण उघड्यावर आणले.आपण कोरोना कोरोना म्हणुन भुई थोपटत बसलो आहोत.कोरोना ही सुरवात आहे.असे काही होणार हे शास्त्रज्ञ गेली पंचवीस तीस वर्षे ठणाणा करीत ओरडुन सांगत होते.पण आपणापैकी कुणाचे त्याकडे लक्ष होते काय?उलट तिर्थयात्रेच्या नावाखाली सर्वांनी उच्छाद मांडला होता. केदारनाथच्या प्रलयात हजारो लोक नदीच्या पुरात वाहुन गेले. तरी आपले डोळे कुठे उघडले?आता तरी आपण डोळे उघडायला पाहिजेत.
आपण विल्यम वर्डस्वर्थ सारखे निरिच्छ व्रुत्तीने जगणारे लोक नाहीत.महात्मा गांधींचा संसार एका छोट्या पेटीत मावणारा होता.त्यांच्यासारखे निसर्गाशी तादात्म्य पावणे आपल्याला शक्य नाही.लोभ,मोह,मायादी षडरिपुमध्ये गुंतलेली आपण माणसे.पण प्रुथ्वीचे रक्षण व्हायला हवे एव्हढे आपल्याला नक्की वाटते.तेव्हढी अपराधीपणाची भावना आहे हे नशीब.मग काय करुया आपण?काही गोष्टी आपण निश्चित करु शकतो.येती दोन वर्षे नवीन कपडे न घेणे,वाढदिवसादि वर्षावर्षाने येणारे समारंभ साजरे न करणे,लग्नादी मोठ्या समारंभात शंभराच्यावर माणसे न बोलावणे,कोणत्याही समारंभात फटाके न फोडणे,रात्री दहा नंतर सर्वप्रकारचे ध्वनिप्रदूषण थांबवणे,दरदिवशी अर्धा तास व्यायाम करणे,पोषक आहार घेणे,आरोग्याकडे लक्ष देणे,घरासाठी केवळ एकच वाहन ठेवणे,कसेही करुन झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न न पाहाणे,वारोंवार तिर्थयात्रेला न जाणे.जायचेच असेल तर पुर्वीसारखे चालतचालत,घोड्यावर किंवा सायकलवर जाणे,पिकनिक संस्कृतीला तिलांजली देणे,गरजेपुर्ती ईंधनचलित वाहने वापरणे,जिभेचे चोचले कमी करणे,मनोरंजनांना आवर घालणे,पाण्याचा अत्यंत जपुन वापर करणे,घाण केरकचरा कमी करणे,पर्यावरणाच्या चळवळीत सामिल होणे,चळवळीला यथाशक्ती दान देणे,कायदे पाळणे आदी व अन्य बर्याच गोष्टी करुन आपण प्रुथ्वीचा बचाव करु शकतो. आपल्या संपत्तीचा किमान दहावा हिस्सा आपण ईतरांच्या भल्यासाठी वापरणे हे निसर्गाला वाहिलेले अर्ध्य ठरेल.एव्हढे जरी आपण केले तर त्या महामानवांच्या आवाहनांना आपण मानवंदना दिल्यासारखे होईल.त्यात सार्या प्राणीमात्रांचे आणि जीवस्रुष्टीचे भले आहे.प्रश्न ईतकाच आहे की आपण हे सगळे करणार आहोत का?अन्यथा उत्तर असे आहे की याच शतकाच्या अखेरीस मनुष्मात्र दुर्मिळ प्रजातीत पोहचेल.