
मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यासह महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलकडे तक्रार ?
चुकीचा उपचार करणार्या डॉक्टरवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ?
दोषी डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास मयता च्या कुटुंबियांचा उपोषणाला बसण्याचा इशारा ?
वसई,दि.9-6-19:- वसई तालुक्यातील बंगली येथील कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटल आणि उपचार करणार्या डॉ. पुनम वानखेडे यांच्या चुकीच्या उपचार पध्दतीमुळे, निष्काळजीपणामुळे व अज्ञानामुळे दवाखान्यात दाखल केलेल्या वसईरोड येथील सौ. लक्ष्मी अनिल सेठी (वय 44) या महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी तक्रारीत केला आहे.
याबाबत हॉस्पिटलच्या प्रशासनावर व उपचार करणार्या डॉ.पूनम वानखेडेवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे मुख्य रजिस्ट्रार यांच्याकडे महिलेचे नातेवाईक सुनिल सेठी यांनी केली आहे.
याबाबत सेठी यांनी केलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, सौ.लक्ष्मी अनिल सेठी यांना दि. 14.04.2019 रोजी आजारी असल्याने उपचारासाठी कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उपचाराचा चार्ज डॉ.पुनम वानखेडे यांनी घेतला आणि त्यांची तपासणी करुन त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करुन उपचार सुरु केले व एक आठवड्याने डॉ.पुनम वानखेडे यांच्याकडे रुग्णाच्या तब्येतीबाबत चौकशी केली असता, त्यांनी रुग्णास टी.बी.असून चिंता करण्याचे कारण नाही. एक महिन्यात त्या ठीक होतील, असे सांगितले. नंतरच्या काळात त्यांनी आणखी विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. परंतु लक्ष्मी सेठी यांची तब्येत सुधारण्या ऐवजी दिवसेंदिवस ढासळत गेली. उपचारा दरम्यान त्यांना भयंकर वेदना होत होत्या. त्यासाठी आम्ही वारंवार डॉ. पुनम वानखेडे यांची भेट घेऊन सत्यपरिस्थिती जाणण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु त्यांनी अन्य अधिक माहिती दिली नाही.
अखेर हतबल होऊन स्थानिक खाजगी डॉक्टर संतोष पिल्ले यांच्याकडे आम्ही सेकंड ओपिनियन घेण्यासाठी गेलो. त्यांना दिनांक 06.05.2019 रोजी रात्री भेटून सर्व परिस्थिती कथन केली व त्यांना एकदा स्वतः येऊन लक्ष्मी सेठी यांची तपासणी करावी अशी विनंती केली. त्यानुसार दिनांक 07.05.2019 रोजी पहाटे 6.30 वाजता डॉ. पिल्ले यांनी जाऊन रुग्णाची तपासणी केली व थोड्याच वेळात त्यांनी लक्ष्मी सेठी यांना कॅन्सर असण्याची शक्यता व्यक्त केली व लगेच बायोस्पी, अँडोस्कॉपी करुन घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही ही टेस्ट करुन घेतली. दि. 13.05.2019 रोजी त्याचा रिपोर्ट आला. त्यामध्ये लक्ष्मी सेठी यांच्या पोटात गाठ आढळून आली. तरीसुध्दा डॉ. पुनम वानखेडे यांनी ती गाठ टी.बी.ची असल्याचा दावा केला व तीच औषधे कायम सुरु ठेवली. त्यावर आपण आमची केस बिघडवली आहे, असे त्यांना सुनिल सेठी यांनी सुनावले असता, त्यांनी त्यांच्याबरोबर असभ्य व मग्रुरीच्या भाषेत वाद घातल्याचे सेठी कुटुंबियांचे
म्हणणे असून या प्रकरणी हॉस्पिटल कमिटीचे अध्यक्ष फ्रान्सिस कुटीनो व उपाध्यक्ष अन्सेंस परेरा, तसेच जनरल मॅनेजर फ्लोरी मॅडम यांच्याकडे तोंडी तक्रार केली होत्याचे त्यांनी म्हटले आहे .
त्यानंतर दि. 27 मे 2019 रोजी हॉस्पिटलने नातेेवाईकांकडे लक्ष्मी सेठी यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास डॉक्टर, हॉस्पिटल अथवा स्टाफ जबाबदार राहणार नाहीत असे पत्र लिहून मागितले. ते देण्यास नातेवाईकांनी नकार दिला. अशा चुकीच्या उपचार पध्दतीमुळे लक्ष्मी अनिल सेठी यांचा दिनांक 30.05.2019 रोजी दुपारी 2.20 मि. यातनामय मृत्यू झाला,असा आरोप या तक्रारीत सेठी यांनी केला आहे.
डॉ. पूनम वानखेडे यांच्या चुकीच्या उपचार पध्दतीमुळे आणि वेळेवर डायग्नोसिस न केल्यामुळे लक्ष्मी सेठी यांच्यावर कॅन्सवरचे उपचार करणेसुध्दा कठीण झाले. 20-25 दिवस अगोदरच कॅन्सरचे निदान झाले असते व त्यांच्यावर वेळेवर उपचार झाले असते, तर त्यांचा जीव वाचला असता. या सर्व प्रकाराबाबत हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टरवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही सहपरिवार वसई तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे

गेली 36 वर्षे सामाजिक जाणीवेतून हॉस्पिटल ट्रस्ट रुग्णसेवा देत असून, 20 खाटांपासून सुरु झालेला प्रवास आज 130 खाटांपर्यंत पोहचला आहे. सुमारे 400 च्या स्टाफ तर्फे अनेक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आम्ही माफक दरात पुरवत असून, आर्थिक दुर्बल घटकांसाठी वर्षाला सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिल्या जाते. डॉ. पूनम वानखेडे या 17/18 वर्षे येथे कार्यरत असून, त्यांच्याबाबत अशी तक्रार प्रथमच झाली आहे. तरी त्यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांनी केलेल्या उपचाराची योग्य आणि गांभीर्याने चौकशी करून, त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
—- फ्रान्सिस कुटिनो, अध्यक्ष : कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटल , बंगली,वसई