वसई(प्रतिनिधी) वसई विरारमध्ये कोरोनाने थैमान घातलेला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असून मनपा प्रशासन आपले सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नुकतेच प्रभाग समिती “जी” हद्दीतील वरूण इंडस्ट्रीयल इस्टेट, गोलानी नाका, वालीव, वसई पुर्वे येथे मनपाने १००० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये अवघ्या ०५ दिवसात सौम्य लक्षणे असलेले व लक्षणे दिसत नसलेले ६१० पॉझीटीव्ह रूग्ण दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु कोविड सेंटरमधील रूग्णांच्या गैरसोयीचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेले असून रूग्ण तथा नागरीकांमार्फत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रूग्णांची गैरसोय लक्षात घेता प्रभाग समिती “जी” चे माजी सभापती श्री. कन्हैया (बेटा) भोईर यांनी मा. नगरसेवक श्री. रमेश घोरकना व श्री. मिलींद घरत यांचे समवेत वरूण कोविड केंद्राचे संचालक श्री. प्रताप कोळी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थितीचा आढावा घेतला.

आमदार श्री. हितेंद्र ठाकूर यांच्या सेवाभावी संस्थामार्फत पुरविण्यात येणारे मोफत जेवण पुरवठा होऊनही मनपाच्या वाहतूक समस्येमुळे वेळेवर पोचत नसल्याचे दिसून आले. रूग्णांची गैरसोय लक्षात घेता आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले. ज्यामध्ये पाण्यासाठी व जेवणासाठी स्वतंत्र टेम्पो, आणीबाणी वेळ प्रसंगासाठी स्वतंत्र रूग्णवाहिका, फायर ब्रिागेड वाहन व इतर आवश्यक सुविधांचा समावेश आहे. पावसाचे पाणी येत व साचत असलेल्या ठिकाणांची पाहणी करून त्या ठिकाणी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने केंद्रातील आवश्यक सेवांवर ताण पडत आहे. परंतु तरीही महानगरपालिकेमार्फत रूग्णांना सेवा पुरविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. वरूण इंडस्ट्री कोविड सेंटर नुकतेच सुरू झाले असून आवश्यकतेनुसार सर्व सुधारणा करणेबाबत मा. सभापती कन्हैया (बेटा) भोईर यांनी केंद्र संचालकांना सुचित केले. सुयोग्य नियोजन व एकमेकांच्या सहकार्याने कोरोनासारख्या महामारीचा ध्येर्याने सामना करू, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed