वसईतील सामजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांचा निर्णय!

विरार (प्रतिनिधी): कोविड-१९ मुळे देशभरात उद्भवलेली स्थिती पाहता या वर्षी ‘बकरी ईद’ साजरी न करण्याचा निर्णय वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांनी घेतला आहे. याऐवजी आपण कुर्बानीसाठी होणारा खर्च पंतप्रधान व मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देणार असल्याची माहिती तसनीफ़ नूर शेख यांनी दिली.

कोविड-१९ मुळे अनेक लोकांवर आर्थिक आणि आरोग्य संकट कोसळले आहे. ही स्थिती लक्षात घेता आपण ‘बकरी ईद’निमित्त कुर्बानी देणे योग्य नाही. आपल्या अन्य धर्मबांधवांनीदेखील त्यांचे सण आणि उत्सव साजरे केलेले नाहीत.

आपल्या देशावर आणि पर्यायाने इथल्या प्रत्येक व्यक्तीवर आलेले हे संकट पाहता; या संकटाशी लढणे, ही आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.

त्यामुळे आपण सगळ्यांनीच खरे तर तसा निर्णय घेतला पाहिजे, असे शेख यांचे मत आहे. शेख यांनी आपल्या मुस्लिम बांधवांनाही या वेळी कुर्बानी न देता पंतप्रधान व मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मदत करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, घरांत आणि अन्य ठिकाणी बकरी ईद साजरी करणार असाल तर सोशल डिस्टनसिंग आणि अन्य काळजी घेण्याचे आवाहनदेखील शेख यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *