

वसई(प्रतिनिधी) – जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना अशा परिस्थितीत साथ बंद प्रतिबंध कायदा अन्वये वविमनपाने आपल्या क्षेत्रातील विविध डॉक्टर संघटनांना हाताशी घेऊन या संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली होती. त्या आधारे वविमनपा क्षेत्रात “फिव्हर क्लिनिक” करीता डॉक्टर संघटनांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आपली सेवा गेली 3 महिने अविरत चालू ठेवली आहे.
वसई तालुका आयुर्वेदिक ग्रॅज्युएट वेल्फेअर असो., वसई तालुका होमिओपॅथी असो., आय एम ए वसई, नालासोपारा डॉक्टर असो. अशा विविध संघटनांच्या डॉक्टरांनी या सेवा देत असतानाच वविमनपा आरोग्य विभाग व वविमनपा आयुक्त यांच्या कडे लेखी स्वरूपात मागण्या ठेवल्या होत्या. इतर महानगरपालिकेत डॉक्टरांना मानधन देण्यात येत पण आपल्या येथे गेली 3 महिने “फिवर क्लिनीक” वर सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर उपासमारीची वेळ येऊ लागलीय असे चित्र दिसत आहे. अशातच डॉक्टरांना कोविड रुग्णालयात सेवा देण्याचे अध्यादेश जारी करून डॉक्टर संघटनांच्या मागणी वजा समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कोविड ड्युटी करताना एखाद्या डॉक्टरला कोविड झाले तर त्यांच्यावरील उपचारखर्च पुर्णपणे वविमनपाने पहावा व डॉक्टरांना विमा संरक्षण मिळावे या मागण्या प्रामुख्याने डॉक्टर संघटनांनी वविमनपा आरोग्य विभाग व आयुक्तांकडे ठेवल्या होत्या व अजूनही या मागण्यांच्या पुर्ततेकरीता चालढकल होतेय असे मत संघटनांनी वैद्यकिय अधिकारी डॉ तबस्सुम काझी यांच्याजवळ मांडले आयुक्त आमच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा करायला वेळही देत नाही अशी तक्रार मांडून खेद व्यक्त केला.
वविमनपा आयुक्तांनी लवकरात लवकर डॉक्टर संघटनांशी समन्वय साधून कोरोना प्रादुर्भाव काळातील डॉक्टरांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावी, डॉक्टर जगेल तर रुग्ण तरेल असे मत आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केले.