
वसई : भाजपा वसई-विरार जिल्ह्याच्याकडून वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात वसई पारनाका येथे उत्स्फूर्त आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन पार पडले. दूध उत्पादकांना लिटर मागे दहा रूपये तसेच दूध भुकटीला 50 रुपये अनुदान मिळावे व राज्यात महावितरणा कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके या विरोधात वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जिल्हा महासचिव राजू म्हात्रे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्याम पाटकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी यावेळी बोलताना, वसई-विरारमध्ये राहणारे अर्ध्या अधिक नागरिक हे मुंबईला कामावर असल्यामुळे मागील 4 महिन्यांनापासून अनेकांच्या हाताला काम नाही आहे. हातावर पोट असलेले कामगारांची अवस्था ही त्याहूनही भिकट आहे अशावेळी वाढीव वीजबिल देऊन तिघाडी सरकारने वसई-विरारच्या जनतेवर अक्षरशः रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आणली आहे. कोरोनाच्या परिस्थिती लॉक-अनलॉकचा घोळ असताना आज नागरिक महावितरण कार्यालयाच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत हे क्लेशदायक आहे. असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघटन महासचिव महेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्ह्याचे महासचिव उत्तम कुमार यांनी केले. यावेळी मोठ्याप्रमाणात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.