
पुढील वर्षी दुनिया पाण्याखाली जाईल; पण वसई-विरार जाणार नाही, असा आमदार #हितेंद्र ठाकूर आणि #वसई-विरार पालिकेने छातीठोक केलेला दावा मंगळवार-बुधवारच्या पावसाने पुन्हा एकदा पाण्यात बुडवला.
तब्बल १२ कोटी रुपये खर्च करून ‘निरी-आयआयटी’ या संस्थांनी दिलेल्या सूचना प्रस्तावाची महापालिकेने अंमलबजावणी न केल्यानेच वसई-विरार सातत्याने पाण्याखाली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वसई-विरार शहर सातत्याने पाण्याखाली जात असल्याने तात्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी २०१८ साली तब्बल १२ कोटी रुपये खर्च करून ‘निरी-आयआयटी’ या संस्थांची नियुक्ती केली होती. या संस्था वसई-विरारच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून अहवाल देणार होत्या. त्यानुसार वसई-विरार महापालिका उपाययोजना करणार होती.
मागील वर्षी निरी-आयआयटीने याबाबत प्राथमिक अहवाल वसई-विरार महापालिकेला सादर केला होता. यात तातडीने करण्याच्या उपाययोजना सूचवण्यात आल्या होत्या. या अहवालाव्यतिरिक्त दरवर्षी प्रदीर्घ कालावधीकरता उपाययोजना आणि कामे करण्याविषयी ‘निरी-आयआयटी’ अहवाल सादर करणार होती. मात्र प्राथमिक अहवालातील एकाही सूचनेवर पालिकेने कार्यवाही केलेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे २०२० चा २० पानी अहवालही #वसई-विरार महापालिकेला प्राप्त झाला आहे. या अहवालात १७ प्रस्तावित कामे सूचित करण्यात आली आहेत. तर पान क्रमांक पाचवर २०२० सालातील महत्त्वपूर्ण आणि प्राधान्याने करण्याविषयीच्या कामाबाबत माहिती देण्यात आली आहे.
यात नवीन नाले, नाल्यांचे रुंदीकरण, साठवण जागा, पंपिंग केंद्र आणि छोटे नाले इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त दोन ‘धारण तलावां’ही यात विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
या वर्षी सूचित करण्यात आलेली काम कोट्यवधी रुपयांच्या घरात जाणारी आहेत. मात्र वसई-विरार महापालिकेने यातील एकही काम तड़ीस नेलेले नाही. परिणामी वसई-विरार शहर यंदाही पाण्याखाली गेले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात वसई-विरार महापालिकेचे कार्यकारी शहर #अभियंता राजेंद्र लाड़ यांच्याशी संपर्क केला असता; ते बैठकीत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
◆ मान्यवरांच्या प्रतिक्रिया
मागील महिन्यात वसई-विरार महापालिकेने वसईतील सागरशेत पेट्रोल पंपाजवळ नाला दुरुस्तीचे काम केले होते. यासाठी पालिकेने १२ लाख ४० हजार रुपये खर्च केले होते. मात्र त्यानंतरही या ठिकाणी यंदा पाणी भरत आहे.
तसनीफ़ नूर शेख, सामजिक कार्यकर्ता, वसई
◆ ‘निरी-आयआयटी’ने सूचवलेल्या प्राथमिक उपाययोजनांवरच वसई-विरार महापालिकेने काम केलेले नाही. ही कामे झाली असती तर काही प्रमाणात वसई-विरारकरांना दिलासा मिळाला असता. पण महापालिका थातूरमातूर कामे करून नागरिकांना उल्लू बनवत आहे. प्राथमिक अहवालात ज्या ठिकाणी पाणी तुंबते तिथली अनधिकृत बांधकामे हटवण्यास सांगण्यात आले होते. ही बांधकामे हटवण्यात आलेली नाहीत. महापालिकाही हे मान्य करते. याशिवाय ज्या ठिकाणी नाले रुंदीकरण आणि खोली वाढवण्यास सूचित केले होते. ही कामे झालेली नाहीत. नालेसफाईदरम्यान खाड्यांच्या तोंड़ावरील मैंग्रोजची झाड़े तोडून खाड्यांचा मार्ग मोकळा करणे अपेक्षित होते. या खाड्यांतून पूर्वी जहाजे जात; त्या खाड्या चिखलामुळे १० ते १२ फुटांच्या झाल्या आहेत.
मिलिंद चव्हाण, उपशहरप्रमुख, शिवसेना-वसई
◆ शहराच्या तिन्ही बाजूंनी पाणी आणि एका बाजूने डोंगरी भाग आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सिडको नियोजन आराखड्याप्रमाणे शहर विकास झालेलाच नाही. मोठ्या प्रमाणात पाणथळ जमिनीवर अनधिकृत भराव करण्यात आले. सिडकोने सुचवलेले होल्डिंग पौंडसुद्धा बनवले नाहीत. त्यामुळे शहरांमधून पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. नियोजनाप्रमाणे काम न झाल्यामुळे आज वसई-विरारांना अनेक वर्षांपासून पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. नाले सफाईच्या नावाने कोट्यवधी रुपयांची टेंडर निघतात. त्यात फक्त शहराचे मोठे नाले साफ होतात. शहराच्या अंतर्गत छोट्या नाल्यांमध्ये कुठली प्रकारची साफसफाई होत नाही.
चरण भट, पर्यावरण अभ्यासक, वसई
◆ वसई-विरार महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा आतापर्यंतचा भ्रष्टाचार याला कारणीभूत आहे. वसई-विरारकरांचे १२ कोटी आणि अन्य शेकड़ो कोटी रुपये खर्च करून नागरिकांना असे हाल सोसावे लागणार असतील तर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिलेले आश्वासन हे ‘मगरमच्छ के आंसू’च म्हणावे लागतील.
निलेश तेंडोलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, पालघर
◆ आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ज्या वेळी दावा केला होता; त्या वेळी आम्ही ही कामे करण्यासाठी कार्यक्रम आखला होता. त्यासाठीची सर्व ती तयारीदेखील केली होती. मात्र कोविड-१९च्या प्रादुर्भामुळे चार महिने वाया गेले. त्यात पालिकेत प्रशासकीय राजवट लागली. निरी-आयआयटीने सूचवलेली कामे खर्चिक असली तरी यातली महत्त्वाची कामे हाती घेतली होती. यात दोन-तीन नाले प्रस्तावीत होते. ते करण्यात आले आहेत. गास रस्त्याची हद्द वाढवणे, दोन-तीन क्रॉसिंग, तांदूळ बाजार येथील नाला अशी कामे हाती घेण्यात आली होती. नालासोपारा पूर्व येथील नाल्याचे थोड़ेफार बांधकाम करण्यात आले होते. रेल्वेच्या प्रस्तावित नाल्यांवरची कामे होती. ती करण्यात आली आहेत.
प्रवीण शेट्टी, माजी महापौर, वसई-विरार महापालिका
◆ वसई-विरारमध्ये मुसळधार! अनेक भाग पाण्याखाली
वसई-विरार शहरात पुन्हा एकदा सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी दुपार व पुन्हा बुधवारी पहाटेपर्यंत झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले.
वसईतील सागरशेत, चुळणे, दिवाणमान, डी. जी. नगर, तर नालासोपारा पूर्व, सीताराम बेकरी, तुळींज पोलीस स्टेशनसमोर, गाला नगर रोड या भागांमध्ये दीड फुटापर्यंत पाणी साचले होते. तर विरार पश्चिम येथील विवा कॉलेज परिसरात पाणी भरले होते. या वर्षी मागील महिन्यात दोनदा झालेल्या मुसळधार पावसात याच भागांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.