

वसई (प्रतिनिधी)- कोरोनाच्या सावटातून संपूर्ण जग बाहेर येताना वसई-विरार महापालिका हद्दीतून कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने आता एक नवा कार्यक्रम आखला आहे. आता पक्षातर्फे ‘मिशन सुपर ३०’ या मोहिमेअंतर्गत वसई-विरार महापालिका हद्दीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जलद गतीने चाचणी होणार आहे. विशेष म्हणजे ३० दिवस चालणारी ही मोहीम राबवण्यासाठी वसई-विरार महापालिकेनेही पक्षाला पाठिंबा देत पुढाकार घेतला आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीतील जास्तीज जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यावरून कोरोनाचा प्रादूर्भाव किती झाला आहे, याची कल्पना येईल. तसंच जे कोरोनाबाधित असतील, त्यांना तातडीने उपचार देणं शक्य होईल. ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहेत, त्यांची रवानगी विलगीकरण केंद्रांमध्ये केली जाणार आहे. ‘कोरोनाबाधितांची संख्या एका मर्यादित वेळेत कळावी, हा या मोहिमेमागचा हेतू आहे. जेवढ्या जास्त लोकांच्या चाचण्या होतील, तेवढं आम्हाला हा आजार पसरवणं थांबवता येईल,’ बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं.
अधिकाधिक चाचण्या करण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर, हँड ग्लोव्ह्ज आदी गोष्टींचा पुरवठा करण्यावरही या मोहिमेत भर दिला जाणार आहे. ‘या मोहिमेद्वारे किमान १० हजार मास्क आणि तेवढीच कोविड कीट यांचा पुरवठा लोकांना केला गेला आहे. त्याशिवाय तापमान मोजणाऱ्या ५०० टेंपरेचर गन आणि ५०० ऑक्झिमीटरही लोकांना दिले आहेत,’ अशी माहिती नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी दिली.
मार्चमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यापासूनच बहुजन विकास आघाडीने वसई-विरार परिसराला कोरोनापासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या आहेत. थेट लोकांना मदत करण्यापासून सरकारी यंत्रणांनाही सहाय्य करण्यावर पक्षाने भर दिला आहे. कोरोनाचं संकट दूर होईपर्यंत या विषाणूशी दोन हात करण्याचा चंग पक्षाने बांधला आहे.
*****