

(मुंबई)-दरवर्षी आदिवासी बांधव मोठ्या जल्लोषात ‘आदिवासी गौरव दिवस’ साजरा करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा दिवस ऑनलाइन पध्दतीने साजरा करण्यावर भर देण्यात आला. यासाठीच आदिवासी समाजाच्या वैचारिक जडणघडणीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागतर्फे प्रथम राष्ट्रीय ऑनलाईन नृत्य आणि फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ ऑगस्ट २०२० दुपारी ३.०० वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.
आदिवासी समाज हा एक नेहमीच नाविन्यपूर्ण आणि आकर्षणाचा भाग राहिला आहे. या आदिवासी, अनुसूचित जाती- जमातीचे राहणीमान, खाणपाण, संस्कृती, वास्तूकलेने समाजात एक वेगळी छबी निर्माण केली आहे. आणि याच संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. पर्यावरणाशी एकरूप झालेल्या आदिवासी जमातीच्या परंपरा, सण, उत्सवाचे संस्कृतीचे जतन, संवर्धन, प्रचार करणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
आदिवासी, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील जनतेच्या स्वविकासाठी सामाजिक आर्थिक चळवळ समर्थित महाराष्ट्र आदिवासी विकासमंत्री मा.ना.अॅड. के. सी. पाडवी, उपसभापती मा. ना नरहरी झिरवाळ, अकोला विधानसभा आमदार मा. डॉ. किरण लहामटे व महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत.
सर्व आदिवासी बांधवांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचे दर्शन, संपूर्ण जगाला दाखवा अशी विनंती आदिवासी बांधव डॉ. निलेश परचाके, सचिन आत्राम (मुंबई), संतोष पेंढोर (पांढरकवडा) यांना केली आहे. त्यामुळे अधिकाधिक आदिवासी बांधवांनी या स्पर्धेत सहभागी होत स्पर्धेची शोभा वाढवावी.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांसाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून aborigineculturalfest20@gmail.com या नोंदणी ईमेलवर माहिती द्यावी. अधिक माहितीसाठी सुवर्णा खाडे 9325289653, धनंजय पिचड 8104875584 यांच्याशी संपर्क साधावा.