
मनसे कामगार सेनेच्या मागणीची कामगार व पालिका उपायुक्तांकडून दखल!
विरार(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या घनकचरा विभागात कचरा संकलन व गटार सफाई करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत सुट्टीचे वेतन तात्काळ अदा करण्याचे आदेश
कामगार व पालिका उपायुक्तांनी सर्व ठेकेदारांना जारी केले आहेत.याबाबत मनसे प्रणित महापालिका कामगार कर्मचारी
सेनेचे उपाध्यक्ष मिलिंद साळवी व सरचिटणीस चंद्रशेखर गुंजारी हे गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करत होते.परंतु ठेकेदारांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने मनसेने कामगारांचे २०१९ या वर्षाचे सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचे वेतन मिळणेबाबत कामगार उपायुक्त, पालघर तसेच पालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.या अनुषंगाने कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर यांनी वसई विरारच्या महापालिका आयुक्त यांना महापालिका क्षेत्रातील कंत्राटी सफाई कर्मचारी यांना सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचे वेतन देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.यानुसार महापालिका उपायुक्त यांनी संबंधित सर्व ठेकेदार यांना कर्मचारी यांना सुट्टीचे वेतन देण्याचे आदेश काढले. यामुळे कंत्राटी कर्मचारी यांच्या खात्यात लवकरच सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचे वेतन हे शासनाच्या परिपत्रकानुसार जमा होणार आहे.
वसई विरार पालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांमध्ये एकूण ३४१२ कर्मचाऱ्यांची घनकचरा विभागात कचरा संकलन व गटार सफाईसाठी ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेली आहे.या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना २०१९ या वर्षाचे सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामांचे वेतन ठेकेदारांनी आजपर्यंत अदा केलेले नाही.सदर बाब मनसे प्रणित कामगार सेनेच्या निदर्शनास येताच कामगार उपायुक्त पालघर व पालिका आयुक्तांकडे २७ जून रोजी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कामगार उपायुक्तांनी पालिकेचे अति.आयुक्त व अनंत एंटरप्राइजेस, दिनेश संखे, उजाला लेबर कॉन्ट्रॅक्टर,साई गणेश या ठेकेदारांना ३० जून रोजीच्या पत्रांन्वये कळविले होते.
परंतु पालिका अति.आयुक्त व ठेकेदारांनी कामगार उपायुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवत सफाई कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक करत त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवले.याबाबत मनसेने पुन्हा कामगार उपायुक्तांकडे धाव घेत सदर ची बाब पूर्णपणे निंदनीय असून एकप्रकारे कामगारांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार कामगार उपायुक्तांनी २४ ऑगस्ट रोजी पालिका उपायुक्तांना पुनश्च आदेश जारी करत कामगारांचे थकीत वेतन करण्याचे फर्मान केले आहे. कामगार उपायुक्तांच्या आदेशानुसार पालिका उपयुक्तांनी सर्व प्रभागातील ठेकेदारांना त्या कामगारांचे तात्काळ अदा करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.दरम्यान कर्मचारी यांचे थकीत वेतन मिळणेबाबत मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष मिलिंद साळवी व सरचिटणीस चंद्रशेखर गुंजारी हे पाठपुरावा व पत्रव्यवहार करून कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यास प्रयत्न केले आहेत. या पाठपुराव्यास कोषाध्यक्ष प्रथमेश सावंत, प्रभाग समिती चिटणीस रोनित नेरूरकर, मनोहर घरटकर, आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
वसई विरार मधील कंत्राटी सफाई कर्मचारी यांना शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे कामगार उपायुक्त, महापालिका उपायुक्त यांच्या आदेशानुसार ठेकेदार यांनी ‘सुट्टीचा पगार’ देणे हे बंधनकारक आहे. याबाबत आम्ही कामगार उपायुक्त व महापालिका आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली होती.संबंधित ठेकेदार यांनी लवकरात लवकर कर्मचारी यांचे सुट्टीचे थकीत वेतन तत्काळ वितरित करावे अन्यथा संपूर्ण महापालिका क्षेत्रात दैनंदिन काम बंद केले जाईल.
– चंद्रशेखर गुंजारी ( सरचिटणीस-मनसे प्रणित महापालिका कामगार कर्मचारी सेना )