

वसई : (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची बदली होऊन त्यांच्या जागी आता मुंबई शुल्क नियामक प्राधिकरणचे सचिव एम.जी.गुरसळ हे हे पालघरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार आहेत. राज्याचे अपर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक यांनी तसे गुरसळ यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांना दिले आहे. पालघर जिल्ह्याचे चौथे जिल्हाधिकारी म्हणून एम.जी.गुरसळ हे पदभार स्विकारणार आहेत. एम.जी. गुरसळ हे 2009 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रूजू झाले आहेत.
सध्या पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त बळीराम पवार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर गंगाथरन डी. हे महापालिकेला तिसरे सनदी अधिकारी म्हणून लाभले. तत्पूर्वी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे हेच महापालिकेचा अतिरीक्त कारभार सांभाळत होते. आता डॉ.कैलास शिंदे यांचीच पालघरच्या जिल्हाधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर एम.जी.गुरसळ हे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. पालघरच्या जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्विकारण्याआधी सएम.जी.गुरसळ यांनी ते सध्या सांभाळत असलेल्या मुंबई शुल्क नियामक प्राधिकरणातील सचिव पदाची सुत्रे त्यांनी अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकार्याकडे सोपवून नवीन पदाची सुत्रे स्विकारायची आहेत, असे आदेश अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याच्या विविध समस्यांना न्याय देण्याचे आव्हान एम.जी.गुरसळ यांना पेलावे लागणार आहे. सागरी, डोंगरी आणि नागरी अशा तीन टप्प्यांत विभागणी झालेल्या पालघर जिल्ह्याचा कार्यभार सांभाळताना त्यांना विशेष प्रयत्नांची जोड द्यावी लागणार आहे.