वसई : (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील महाड येथे झालेल्या इमारत दुघटनेची पुनरावृत्ती नालासोपार्‍यात होता होता टळली. मात्र दैव बलवत्तर म्हणून इमारतीत वास्तव्याला असलेल्या रहीवाशांच्या सतर्कतमुळे जिवितहानी टळली. नालासोपारा पूर्वेतील संख्येश्‍वर नगर परिसरातील कपोळ शाळेलगत असलेल्या साफल्य इमारतीचा काही भाग रात्री 11:30 वाजताच्या सुमारास कोसळला. त्यामुळे सतर्क झालेल्या नागरिकांनी तात्काळ इमारतीबाहेर धाव घेतली. त्यानंतर दोन तासाने रात्री दीड वाजताच्या सुमारास सदर इमारत कोसळली. इमारत त्याचक्षणी कोसळली असती तर इमारतीत राहणार्‍या 20 जणांच्या जीवाला अपाय होऊ शकला असता. इमारत 4 मजली असल्याने तसेच ती जिर्ण झाल्याने ती कोसळली. वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा याआधीच कळीचा ठरला आहे. त्यात धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. दामदुपटीने पैसे उकळून विकासक निकृष्ठ बांधकामे करून ती सर्वसामान्य नागरिकांच्या माथी मारत आहेत. यातून विकासकांच्या विश्‍वासहार्यतेवर प्रश्‍न निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांचे त्यात प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. प्रसंगी त्यांना जीवाला मुकावे लागत आहे. याच धर्तीवर आता वसई विरारमधील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींचा प्रश्‍न पालिकेने समोर ठेवून हजारो कुटुंबे त्यात मृत्यूच्या दाढेत अडकळी आहेत त्यांना मरणाच्या दारातून बाहेर काढले पाहिजे. अशी मागणी आता सर्वत्र होत आहे.
पावसाळा सुरू झाला की वसई विरार महापालिकेला आपल्या कार्यहद्दीतील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची आठवण होते. परंतु, ठोस कारवाईऐवजी धोकादायक इमारतीत वास्तव्य करणार्‍या नागरिकांना नोटीसा पाठवू नघरे खाली करण्याचे आवाहन केले जाते. त्यापलिकडे पालिकेकडून कारवाई होत नसल्याने हजारो कुटुंबे धोकादायक इमारतींत वास्तव्य करत आहेत. नागरिक घरे खाली करण्यास नाकर देतात असे तुणतुणे पालिकेकडून सातत्याने ऐकवले जाते. परंतु, प्रयत्नांच्या पातळीवर पालिकेची बोंब आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात पालिका प्रशासन आधीच तोंडावर उताणे पडले आहे. त्यात धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची वर्गवारी करून त्यांचा प्रश्‍न धसास लावण्याचे नियोजन पालिकेला अद्याप जमलेले नाही. महापालिका एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतेय का? असा सवाल यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे. नालासोपार्‍यात घडलेल्या इमारत दुर्घटनेत सुदैवाने जिवितहानी झालेली नसली तरी नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्या घरातील किंमती वस्तू, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांचे नुकसान झाले आहे. कोरोना काळात आधीच खाण्यापिण्याची चंगल झाली आहे. त्यात दुर्घटनेत संसार उद्ध्वस्त झाल्याने या नागरिकांसमोर आता जायचे कोठे? असा प्रश्‍न पडला आहे.

दहा वर्षांतच इमारत जमिनदोस्त – माजी महापौर रूपेश जाधव यांनी व्यक्त केले आश्‍चर्य
बिल्डर अभय नाईक यांच्या बांधकाम निर्माणावर प्रश्‍नचिन्ह
नालासोपार्‍यात साफल्य इमारत कोसळल्यानंतर वसई विरार महापालिकेचे माजी महापौर रूपेश जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दुर्घटनेतून सहीसलामत वाचलेल्या नागरिकांना धीर दिला. सदर इमारत ही बिल्डर अभय नाईक यांनी सन 2009 साली बांधली होती. ती इमारत इतक्यात जीर्ण होऊन दहा वर्षांतच कशी काय कोसळू शकते? असा आश्‍चर्यजनक सवाल माजी महापौर रूपेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे. दहा वर्षात इमारत कोसळल्यानंतर इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होते. यावर शिक्कामोर्तब झाला आहे. याप्रकरणी पालिका आता बिल्डरवर काही कारवाई करते का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नालासोपारा इमारत दुर्घटनेला जबाबदार हीच मंडळी
दरम्यान, नालासोपारा संख्येश्‍वर नगर परिसरात घडलेल्या इमारत दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. रहीवाशांचे संसार गाडले गेले. 2009 साली बांधण्यात आलेली साफल्य इमारत इतकी कमकुवत आणि केवळ 10 वर्षात कोसळण्याइतकत तकलादू बांधकामाची असेल तर बिल्डर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी कसे खेळ मांडत आहेत ते समोर आले आहे. सदरची इमारत ज्या वर्षी बांधली गेली त्यावेळी महापालिकेच्या कोणत्या अभियंत्याने या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा तपासला होता. कोणत्या नगरसेवकाने त्याकडे कानाडोळा केला होता, तसेच पालिकेच्या घरपट्टी विभागातील कोणत्या अधिकार्‍याने या इमारतींतील सदनिकांना घरपट्ट्या लावल्या होत्या. त्या सर्व संबंधित जबाबदार नागरिकांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *