
केळवेः दि. १३ जून , २०१९.“
सफाळे -केळवे, माहिम , पालघर ह्या गावांना जोडणार्या राज्य महामार्गावरील माकुणसार खाडीवरील पुल अजूनही अतिशय धोकादायक स्थितीत असल्याचं निदर्शनास आलं आहे. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सदस्यांनी केळवे गावच्या सरपंच सौ. भावना किणी तसेच माजी सरपंच श्री संदिप किणी, माजी उपसरपंच श्री. प्रविण पाटिल, मच्छिमार सोसायटीचे सदस्य श्री गणेश तांडेल व ग्रामस्थ श्री निलेश चौधरी ह्यांच्यासह ह्या पुलाची पाहणी केली तेव्हा ही गोष्ट निष्पन्न झाली.
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ह्या पुलाला असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करुन पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावे अशी विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचेही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते परंतु आत्ता संस्थेने केलेल्या पाहणीत पुलाची केलेली दुरुस्ती म्हणजे दिखाऊपणा असल्याचे समोर आले आहे. सफाळे विभागाला केळवे , पालघर, माहिम ह्या गावांना जोडणारा राज्य महामार्गावरील हा महत्वाचा पुल असूनही त्या पुलाबाबतीत होणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष हा चिंतेचा विषय बनला आहे. ह्या धोकादायक पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती हाती घेऊन दरम्यानच्या काळित वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायत केळवे ह्यांनी केली आहे.

