

शिवकन्या नम्रता मंगेश शिरकर
(दाभीळ, दापोली)
– सध्याच्या विज्ञान युगातही देशात महिलांच्या असुरक्षितेविषयी गंभीर प्रश्न ‘ जैसे थे ‘ आहेत. २१ व्या शतकात महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असताना असे लाच्छांनास्पद प्रकार का घडतात आणि आम्ही मात्र फक्त आणि फक्त बघ्याची भुमिका घेतो यालाच महिलांच्या वास्तव स्थिती विषयी असणारी अनास्था किंवा अनभिज्ञता म्हणावी लागेल.आमचे कठोर कायदे फक्त आणि फक्त कागदावरच.
देशात दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक बलात्कार,मानसिक छळ,विनयभंग, हुंडा प्रथा, स्त्री-भ्रुणहत्येच्या घटना सातत्याने घडत आहेत. मग अशा गंभीर आणि लांच्छनास्पद प्रकारातून आम्ही काही धडे घेतो की नाही ? शासनाचे अशा प्रकरणासंदर्भात कठोर कायदे का लागू पडत नाहीत ? हीच मोठी शोकांतिका वाटते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांवर अत्याचार झालेले आपण कधी ऐकले का ? आणि जरी एखादी घटना तशी घडली तर गुन्हेगाराला अशी कठोर शिक्षा व्हायची की पुन्हा असे वाईट कृत्य करण्याचे धाडसच कोणी करणार नाही.
आमचे कायदे फक्त नी फक्त कागदावरच राहतात प्रत्यक्ष कृती मात्र जी व्हायला हवी ती होत नाही परिणामी गुन्हेगार दुसरा गुन्हा घडवून आणायला तयारच असतात. हल्ली गुन्हेगाराला सहीसलामत एखाद्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी खाजगी वकील काय, जामीन काय,वशिला काय अनेक जण सहकार्य करताना दिसतात. हे का ? कशासाठी? त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी असे का वाटत नाही ? बिचाऱ्या एखाद्या सर्वसामान्य पिडीतीचे येथे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होते याचे कोणाला काहीच नसते हे खरोखरच दुर्दैव म्हणावे लागेल.महिला सुरक्षा मातृ दिवस, महिला दिन,बालिका दिन,जननी सुरक्षा अभियान कार्यक्रम सातत्याने राबवण्यापेक्षा सरकारने महिला सुरक्षितेकडे अधिक लक्ष व ठोस कायदे करण्याची आज नितांत गरज आहे.
जोपावेतो गुन्हेगाराला धाक व भिती वाटेल, गुन्हांना जरब बसेल अशा कठोर शिक्षा त्वरित मिळण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत असे गुन्हे दिवसेंदिवस घडतच राहणार.
नुसते मेणबत्ती मोर्चे, जनसभांमधून जनजागृती, समुपदेशनाचे डोस,वृत्तपत्रांमधून अग्रलेख,बातम्या, दूरदर्शनवरील चर्चा या बाबी काळानुरुप निढविलेल्या जनमाणसापुढे निरपयोगी ठरणार हे नक्की