
विरार(प्रतिनिधी)-राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३ मार्च २०२० पासून लागू केलेला आहे. याअनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, आपआपसात सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे इ.शासनाकडून आलेल्या आवश्यक सूचना व नियमांची माहिती महानगरपालिकेने वेळोवेळी प्रसिद्धीद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलेली आहे. शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेमार्फत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहीम महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यास सुरुवात झालेली असून त्याव्दारे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे हे मुख्य उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे.
परंतु मागील काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे कि, महानगरपालिका कार्यक्षेत्रात बरेचसे नागरीक सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरत असून सार्वजनिक ठिकाणी थुंकत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हि बाब अतिशय गंभीर असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती स्तरावर प्र.सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालयामार्फत महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांकडून रक्कम रु.१००/- इतक्या आर्थिक दंडाची रक्कम वसूल करणेची कार्यवाही करणेस मा.आयुक्त तथा प्रशासक यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून सदर दंडात्मक कारवाई करणेबाबतच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.