
पालघर(प्रतिनिधि):- सद्या देशावर कोरोना महामारीचे संकट असताना देशात दलित अत्याचाराची मालिका खंडित न होता अविरत सुरू असून, संबंध देशभरात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते आहे.
या देशात लोकशाही व कायदा सुव्यवस्था आहे किंवा नाही याची शंका येथील सर्वसामान्य जनतेला निर्माण झाली असून ”दलित को मत मारो मुझे मारो” म्हणणारे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी व विद्यमान केंद्र सरकार सदर दलित अत्याचाराची मालिका खंडित करण्यासाठी काही प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. फक्त मोठमोठे दलित संरक्षणाचे कायदे बनवून चालत नाही तर प्रत्यक्षात कायदे अमलात आणून काटेकोर पणे कायद्याच्या चौकटीत राबवावे लागतात.त्या साठी संविधान व लोकशाही ला मानणारे व न्याय व्यवस्थेवर विश्वास असणारे अधिकारीवर्ग पण असावे लागतात. व त्याच प्रमाणे निर्भीड व प्रामाणिक मीडिया पण असावी लागते.
देशात सुशांत सिंग राजपूत आणि कंगना राणावत शिवाय दुसरे प्रश्नच नाहीत या आविर्भावाने देशाची ज्या मीडियाला देशातील जनता लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ म्हणून पाहते त्या आपल्या देशातील जनतेची भ्रमनिराशा झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. देशातील प्रचंड वाढलेली बेरोजगारी ,बंद पडलेले कारखाने , नीचांक गाठलेले देशाचे विकास दर, ढासळलेली अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न , दलित, बौद्ध, आदिवासी व अल्पसंख्यांक वरील वाढते अत्याचार, कोरोना महामारीत मरत असलेले लाखो देशवासी, प्रचंड वाढलेली महागाई, आरोग्य विभागाचे वाजलेले तीन तेरा त्यातच सरकारी विभागाचे व सरकारी कंपन्यांचे मोठ्याप्रमाणात होत असलेले खाजगीकरण व विकण्यात येत असलेल्या सरकारी कंपन्या या बाबत जनतेमध्ये प्रचंड जनजागृती करायचे सोडून सुशांत सिंह आणि कंगना या शिवाय दुसरे तुणतुणे मीडिया कडे नाही असे वाटते.
दिनांक 14 सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेश येथील हाथरस येथे एका दलित वाल्मिकी समाजाच्या आपल्या 19 वर्षीय भगिनीवर त्याच गावातील सवर्ण समाजातील गुंड प्रवृत्तीच्या चार नराधमांनी गँगरेप करून पिडीताची जीभ कापून पाठीचा कणा मोडेपर्यन्त तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले होते. गंभीर व मरणावस्थेत त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते व 9 दिवसानंतर शुद्धीवर आल्यानंतर त्या पीडिताने आपल्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराचे कथन इशाराने करून चार आरोपींची नावे जाहीर केली होती.परंतु दुर्दैवाने मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी दिल्लीतील एका हॉस्पिटल मध्ये सदर पीडित मुलीचे मृत्यू झाले. व पुन्हा एकदा एका निरागस मुलीला आपला जीव जातीव्यवस्थेतून गमवावा लागला आहे.
या अत्यंत निंदनीय व अमानवीय कृत्याचे व छिनाल नावाच्या वांजोटी व्यवस्थेचे तसेच सदर घटनेचे दलित पँथर जाहीर तीव्र शब्दात निषेध करत असून,सदर खटला फास्ट ट्रैक कोर्टात चालवण्यात येऊन, आरोपींना जलद गतीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा दलित पँथरच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील अश्या आशयाचे निवेदन पालघर चे उपजिल्हाधिकरी किरण महाजन यांना देण्यात आले.यावेळी दलित पेंथर चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत, जिल्हाध्यक्ष बिंबेश जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष अरशद खान ,जिल्हा महासचिव जगदीश राऊत, पालघर तालुका अध्यक्ष रोहित चौधरी उपस्थित होते.
