


◆ मास्क, सॅनिटायजर, बेडशीट, सॅनिटायजर स्टँड आदी वस्तूंची मदत
वसई : भारतीय जनता पार्टी जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांना वसई पूर्व व विरार पश्चिम मंडळाची जबाबदारी दिल्यानंतर उत्तम कुमार यांनी कामाचा सपाटा लावला आहे. कोरोना काळापासून उत्तम कुमार वसई तालुक्यात अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली निर्मळ प्राथमिक आरोग्य केंद्र व आगाशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मास्क, सॅनिटायजर, बेडशीट, सॅनिटायजर स्टँड भेट म्हणून देण्यात आले. तसेच सर्व कोरोनकाळात महत्त्वाची भूमिका पारपाडणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या हस्ते निर्मळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. चिन्मय चिरकुरडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आगाशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख ऋग्वेद दुग्धाड व तालुका आरोग्य अधिकारी बाळासाहेब जाधव यांचा सत्कार जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी केला.
बाळासाहेब जाधव यांनी उपस्थितांना संबोधित करताना, कोरोना काळात उत्तम कुमार यांची मदत आम्हाला संपूर्ण तालुक्यात लाभली आहे. जेव्हा तालुक्यात एक ही आयसोलेशन वार्ड नव्हता यावेळी पहिले 8 आठ बेडचे आयसोलेशन सेंटर त्यांनी आम्हाला बनवून दिले असे ते म्हणाले.
जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी बोलताना, गावांमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रथिमक आरोग्य केंद्राची महत्त्वाची भूमिका असून ते शिवधनुष्य त्यांनी पेलले याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले.
कार्यक्रमास जिल्हा महासचिव महेंद्र पाटील, पंचायत समितीच्या उपसभापती वनिता तांडेल, जिल्हापरिषद सदस्य आशा चव्हाण, अर्नाळा सरपंच हेमलता बालाशी, वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष कपिल म्हात्रे, मनोज बारोट, आशिष जोशी, कल्पेश नाईक, मंगेश नाईक, जिग्नेश पाटील, भरत भोईर, निलेश नाईक, ऋषभ म्हात्रे, अमोल घरत, प्रकाश घरत, रमेश पांडे आदी पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.