

देशाच्या आणि पर्यायी समाजाच्या विकासासाठी महिलांचे सबलीकरण करणे आज काळाची गरज असताना आपल्याला ऐकायला देखील लाज वाटेल असे घाणेरडे, भीषण प्रकार सातत्याने देशात,समाजात घडत आहेत.रोज येणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये स्त्री अत्याचाराची बातमी नसेल असे होतच नाही. हे सातत्याने का होत आहे? उठ,सूट स्त्रीवर अन्याय,अत्याचार होत चाललेत,तरीपण का गप्प राहतं शासन आणि समाज ?
स्त्रीभ्रूण हत्त्या,विनयभंग, बलात्कार,छेडछाडी,ही सगळी कायद्याने गुन्हा असणारी प्रकरण असून असं करणाऱ्यांसोबत काय केलं जातं? त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाते का? चार दिवस तुरुंगात ठेऊन,जेवण पाणी देऊन पाचव्या दिवशी जामिनावर गुन्हेगारांना सोडून देणं,हा न्याय झाला का? अत्याचार होणाऱ्या महिलांवर कसा काळ आला असेल हे आपण विचार देखील करू शकत नाही,का मिळत नाही न्याय? १५ ऑगस्ट ,२६ जानेवारी आली की त्या दिवशी मोठ्या गर्वाने सगळे बोलतो की,माझा भारत देश महान! पण आपल्या महान देशामध्ये किती घाणेरडे प्रकार अजूनही चालूच आहेत. दिवसा ढवळ्या महिलांवर होणारे बलात्कार कधी थांबणार? दिसत तर सगळ्यांना असतं,पण बोलायला कोणीही पुढे येत नाही.का तर , पोलिसांच्या चौकशीत पडणार कोण,म्हणून सगळे बघ्याची भूमिका घेतात.जोपर्यंत स्वतःवर येत नाही,तोपर्यंत लोक फक्त बघत बसतात.खूप वाईट झालं,अस व्हायला नको पाहिजे होतं हे एवढेच बोलू शकतात.अन्याया विरुद्ध आवाज मात्र कोणीही उठवत नाही.
जोपर्यंत अत्याचार करणाऱ्याला योग्य ती शिक्षा मिळत नाही,तोपर्यंत हे असेच चालू राहणार .गुन्हेगारांना पण आता चांगलंच माहीत पडलंय.चार दिवस मस्त कोठडीत रहायचं,थोड्या दिवसांनी पुन्हा अत्याचार करायला मोकळे,मग कसे कमी होतील अत्याचार?अजून किती निष्पाप मुलींचा बळी जात राहणार?
जिजाऊंनी शिवरायांना योग्य ते शिक्षण देऊन अन्याया विरुद्ध लढायला शिकवलं.महाराजांनी महिलांवर होणारे अत्याचार तर थांबवलेच,पण स्वराज्य स्थापन करून स्वातंत्र्य मिळवून दिले, ते कशासाठी? हे अत्याचार बघून तुम्हाला असं खरंच वाटतं का,कि आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय? शिवरायांच्या काळात स्री ही मातेसमान मानली जायची परंतु दुर्दैव्य म्हणावे लागेल महाराजांच्याच या पावनभूमित आपलीच लोक आपल्याच आया-बहिणींवर अत्याचार करतायत.. किती लाचनास्पद बाब आहे,हे कुठेतरी थांबायला हवं.. सगळ्यांनी आवाज उठवलाच पाहिजे..स्त्रीला न्याय मिळालाच पाहिजे…
आणि गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे तरचं अशा विघातक वृत्तींना आळा बसेल.
आवाज स्त्रीत्वाचा,
आवाज जनशक्तीचा…!