कै.बबन निवाते यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ ..

दापोली:(विशाल मोरे)- तालुक्यातील फणसू गावातील सामाजिक कार्यकर्ते, श्री.खेम मानाई ग्रामदेवतेचे निस्सीम भक्त, प्रसिद्ध तमासगीर कै.बबन गोपाळ निवाते यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी शनिवार, दि.१० ऑक्टोबर २०२० रोजी आकस्मित निधन झाले असून संपूर्ण उन्हवरे पंचक्रोशीत त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सामाजिक वैचारिक भान असलेले प्रयोगशील नेतृत्व आणि पुरोगामी विचारांची बांधिलकी जोपासणारे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व तसेच सर्वात्तम कलाकार म्हणून त्यांची ओळख होती.
गेली अनेक दशके त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून तमाशा, भारुड, देवीचे खेळी,फारसे,वगनाट्य व विविध सामाजिक प्रबोधनाची गाणी सातत्याने गाऊन रसिकजनांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
त्यांच्या सामाजिक कार्याबद्दलची प्रचंड तळमळ व धडाडी या उतरत्या वयातही बरेच शिकवून गेली. त्यांनी केलेले मौलिक कार्य भविष्यात येणाऱ्या पिढीस व समाजास सदैव प्रेरणादायी ठरेल असेच आहे.
कै.बबन निवाते हे फणसू पाटीलवाडीचे आणि संपूर्ण गावाचे आधारस्तंभ होते. वयाच्या १० व्या वर्षापासून आजपर्यंत ग्रामदेवतेच्या शिमग्यामध्ये खेळी म्हणून तमाशात स्री पात्र भुमिका त्यांनी सतत बजावली आहे.
सुख-दुःखात नेहमीच धावून जाणारे कै बबन निवाते यांना लग्नाच्या विधी, धार्मिक पूजा, उत्तरकार्य यासारख्या परंपरागत चालत आलेल्या विधींबाबत प्रचंड ज्ञान होते.
समाज आणि कला या दोन्हींचे उच्चतम भान असलेले हरहुन्नरी कलावंत हरपल्याचे दुःख कुणबी युवाचे शिक्षण विभाग प्रमुख,फणसू गावाचे मुंबई अध्यक्ष प्रविण भागोजी मनवळ यांनी व्यक्त केले आहे.
कै.निवाते यांच्या निधनाने संपूर्ण फणसू गाव एका प्रतिभावंत संवेदनशील कलाकाराला मुकला आहे. तमाशा रंगभुमीतील अभिनयाच्या तेजस्वी पर्वाचा अंत झाल्याची खंत संपूर्ण पंचक्रोशीत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *