

वसई-(संजय राणे)मागे एकदा वसईतील बेणापट्टी-होळी गावात गेलो होतो. शिवसेना तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या घरी. सोबत शिवसेना उपतालुकाप्रमुख अतुल पाटील आणि मित्रवर्य आशिष कदम होते. जुन्या काळातील मोठे ऐसपैसे घर. घराला लागूनच मोट्ठेसे आनंदी भवानी मंदिर. घरासमोर मोकळे अंगण. समोर एक रस्ता आणि पलीकडे नारळी-पोफ़ळीची बाग!
अर्थात; कुणाचेही मन मोहीत झाले असते. मीही त्याला अपवाद नव्हतो. निलेशदादा आणि त्यांचे कुटुंबीय मूळचे कोकणातील. कुडाळचे. अतुल पाटील यांनी दिलेल्या अधिकच्या माहितीत कळले की; आजूबाजूचे बहुतांश लोक हे मूळचे कोकणातीलच आहेत. पण फार पूर्वी कधी तरी येऊन येथे वसलेले.
मनातील उत्सुकता चाळवणे साहजिक होते. तेंडोलकर कुटुंबीय कधी बरे आले असतील? आणि का? काय असेल याबाबतचा इतिहास? याबाबत निलेशदादा यांना आपण नक्की विचारु, हा प्रश्न मनात ठेवून त्या दिवशी आम्ही निघालो खरे; पण जाता जाता फेसबुकवर ‘ वसईत वसलेले कोकण’ अशा आशयाची एक पोस्ट टाकलेली. सोबत तिथल्या परिसराचे फ़ोटोही होते.
पुढे निलेशदादांशी भेट झाली नव्हती. पण तो प्रश्न, ती उत्सुकता मनात घर करून होती. मागे विधानसभा निवडणुकीदरम्यान निलेशदादा विजय पाटील यांच्या प्रचारादरम्यान प्रचंड व्यस्त होते. वसईतील विजय पाटील यांच्याच पत्रकार परिषदेत दादा भेटले तेव्हा मी त्यांना या विषयावर मुलाखत देण्याबाबत माझा मानस बोलून दाखवला होता.
हो नक्कीच… ये एक दिवस वेळ काढून आपल्या वसईतील ऑफिसला. दादा म्हणाले. पुन्हा आम्ही आपापल्या कामात.
मागच्या दिवाळीदरम्यान हा विषय दिवाळी अंकासाठी होईल, असेही वाटून गेले. पण तो योगही आला नाही.
मागे एकदा धावत्या भेटीत मी त्यांना विचारलेच. पण ती भेटही ओघवती होती. पण एक धागा सापडला. ते म्हणाले; निक्की सांगता येत नाही; पण चिमाजी आपा यांनी वसईच्या किल्ल्याला वेढा टाकला तेव्हा नक्कीच आमचे कुटुंबीय त्यांच्या सैन्यात असतील. तेव्हापासूनचेच हे वास्तव्य!
अर्थात; मनाला पटेल अशी बाजू त्यात होती. त्याबाबत कुतूहल होते. कदाचित हेच लढ़वय्ये रक्त त्यांच्यात होते. निलेश तेंडोलकर हे शिवसेनेचे एकनिष्ठ सैनिक आहेत. माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पालघर जिल्हासंपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत.
अर्थात; निलेशदादा यांचे वय आणि या माननिय नेत्यांसोबत असलेले जवळचे संबंध पाहता हा माणूस कधीपासून शिवसेनेत असेल? आणि इतका एकनिष्ठ कसा? हे प्रश्नही माझ्या मनात आहेत. तेही कधी जरूर विचारेनच.
पण इतके मोठे असूनही या मोठेपणाचा लवलेश निलेशदादांसोबतच्या बोलण्यात किंवा वागण्यात दिसत नाही. कदाचित त्यांच्यातील हेच गुण त्यांना अधिक मोठे करत असावेत, असे मला वाटते. अगदी शांत आणि संयमी स्वभाव!
गेल्या आठवड्यात आशीष कदम यांचा फोन आला. वेळ असेल तर वसईला जाऊन येऊ. निलेशदादा आणि अतुल पाटील यांना भेटून येऊ म्हणाले.
आम्ही गेलो तेव्हा…. अतुल पाटील कुठे तरी कामनिमित्त बाहेर होते. आणि निलेशदादाही ऑफिसमध्ये पोहचले नव्हते. आशीष कदम यांनी निलेश दादांना फोन केला. आम्ही आलो आहोत तुम्हाला भेटायला, असे सांगितले. दादा म्हणाले, बसा आपल्या ऑफिसमध्ये. आलोच मी अर्ध्या तासात.
आम्ही ऑफिसमध्ये बसून काही वेळ जात नाही; तोच दादा आले. आलात तर जेवून जायचे म्हणाले. जेवण आताच सांगू म्हणाले. म्हणजे गप्पा मारत बसलो की; जेवण यायला उशीर नको.
काय विशेष…? आम्ही म्हणालो, तुम्हीच सांगा. त्या वेळी त्यांनी काही माहिती सांगितली. किस्से सांगितले. तेव्हा लक्षात आले. राजकारणातला या व्यक्तीचा अभ्यास दांडगा आहे. वरवरकरणी पाहणाऱ्याला तो दिसत नाही किंवा दिसणार नाही.
तेव्हाच जाणवले; शिवसेनेच्या माननीय नेत्यांसोबत त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे आणि घनिष्ठ का आहेत ते!
एव्हाना जेवणही आले होते. जेवण करता करता दुसरी गोष्ट लक्षात आली तीही की; ही व्यक्ती ख़ाण्याची प्रचंड शौकीन आहे. दुसऱ्यांना खाऊ घालण्यात त्यांना प्रचंड आनंद वाटतो.
ते म्हणालेदेखील एकटा असलो आणि चक्कर आली तरी साधा वडापावसुद्धा खात नाही. कुणीतरीसोबत हवेच. आणि मित्रांना खाऊ घालण्यात मला आनंद वाटतो.
अर्थात, निलेशदादा शांत-संयमी असले तरी माणसात रमणारे आहेत. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणारे आहेत. ही शक्ति; ही प्रेरणा त्यांना कदाचित त्यांना त्यांच्याच कुलस्वामिनी आनंदी भवानी आईकडून मिळत असावी!
अशा या शिवसेनेला आत्मा मानणाऱ्या एकनिष्ठ शिवसैनिकाचा; मित्रनिष्ठ निलेशदादा यांचा आज वाढदिवस! कुलस्वामिनी आनंदी भवानी आई त्यांना उदंड आयुष्य प्रदान करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना!