21 व्या ‘लीलाई दिवाळी विशेषांका’चे प्रकाशन करतांना अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फा.
फ्रान्सिस दिब्रिटो यांची ग्वाही

वसई, दि.13:- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते आज सकाळी 21 व्या ‘लीलाई दिवाळी विशेषांका’चे प्रकाशन सत्पाळा (ता. वसई, जि. पालघर ) येथील एका निसर्गरम्य वाडीत करण्यात आले. याप्रसंगी ‘लीलाई’चे मार्गदर्शक, तथा ज्येष्ठ पत्रकार अँड्रू कोलासो, वसई कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह रेमण्ड मच्याडो, पदाधिकारी विजय पाटील, साहित्यरसिक जेम्स लोबो आणि ‘लीलाई’चे संस्थापक संपादक अनिलराज रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
गेली वीस वर्षे सातत्याने दर्जेदार दिवाळी अंक देणाऱ्या ‘लीलाई’ परिवाराने यंदाच्या महामारीच्या अतिशय प्रतिकूल काळातही उत्कृष्ट साहित्य देण्याच्या परंपरेशी तडजोड न करता अथक प्रयत्नातून अगदी वेळेत अंक प्रसिद्ध केल्याबद्दल संपादक मंडळाचे कौतुक करून, याप्रसंगी फा. दिब्रिटो पुढे म्हणाले की, “दिवाळी अंक आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलन या दोन महत्वाच्या बाबी मराठी अस्मितेची प्रतीके आहेत. देशात अन्य राज्यात नसतील , पण महाराष्ट्रात मराठी माणसाने ही प्रतीके जिवंत ठेवली आहेत.
यामुळे आपले जीवन अधिक संपन्न आणि श्रीमंत होत आहे. दिवाळी अंकांमुळे नवोदितांच्या लेखनाला कोवळे कोंब फुटतात आणि प्रतिभावंतांच्या साहित्याला नवा मोहोर फुलून येतो. मराठीचे काय होणार? अशी शंका अधून मधून व्यक्त व्यक्त केली जाते. परंतू जो पर्यंत दिवाळी अंक स्टॉलवर झळकून, घरा घरात पोहचतात आणि त्याचे आवडीने वाचन केले जाते, तो पर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही, असा ठाम विश्वासही फा. दिब्रिटो यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. ‘लीलाई’चे संस्थापक संपादक अनिलराज रोकडे यांनी फा. दिब्रिटो आणि अन्य अतिथींचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *