

वसई (प्रतिनिधी) : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त वसई-विरार जिल्हा युवक काँग्रेसतर्फे स्व. इंदिरा गांधी यांना दि. 19/11/2020 रोजी अभिवादन करण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे ‘माँ तुझे सलाम’ या कार्यक्रमांतर्गत वसई-नालासोपारा मतदारसंघातील सुमारे 70 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
या अभिवादन प्रसंगी वसई-विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी भाषण करताना सांगितले की महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे ‘माँ तुझे सलाम’ या कार्यक्रमांतर्गत आपण गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करीत असून देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना देशातील गोरगरिबांनाप्रति असलेल्या कळवळ्याच्या जाणीवेची भेट असेल.
भाषणात ते पुढे म्हणाले की पंतप्रधानपदी विराजमान असताना त्यांनी देशाचे कणखर नेतृत्व करत नागरिकांतील जातीय सलोखा, ऐक्य, बंधुभाव व देशाची अखंडता टिकवून ठेवली. जबरदस्त आत्मविश्वास, धाडसी वृत्ती आणि स्त्री असूनही कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता या जोरावर त्यांनी देशातील नागरिकांचे व देशाच्या भवितव्याचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
बँकांचे राष्ट्रीयीकरण, 1971 चे पाकिस्तान विरुद्धचे युद्ध, ‘ऑपरेशन ब्लू स्टार’द्वारे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लपलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांविरुद्ध केलेली कठोर कारवाई अशा विविध निर्णयांमुळे देशाची अखंडता अबाधित राहिली. ज्याप्रमाणे आई घरातील सर्वांना सांभाळून घेते, त्याप्रमाणे त्यांनी देशाच्या जनतेची काळजी घेतली. त्यामुळे ‘माँ तुझे सलाम’ अंतर्गत त्यांच्या कार्याची दखल घेणे हेच त्यांना अभिवादन ठरेल.
या अभिवादन प्रसंगी काँग्रेस नेते सुधीर खैरे, वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष संदीप कनोजिया, जिल्हा सरचिटणीस सुनील कोवाल, सरचिटणीस रोलॅन्ड लोपीस, सचिव सुजय खैरे, सचिव अंकिता वर्तक, चिंतन पटेल, निलेश उंबरकर, भरत पोटेकर, दीपक साठे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.