
विरार(प्रतिनिधी)-वसई विरार पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होताना दिसत आहे.या अनधिकृत बांधकामांना पालिका अधिकारीऱ्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप होऊ लागला आहे.दरम्यान काल पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी पालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना २४ तासांचा ‘अल्टीमेटम’ देत प्रभागात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्काशीत करण्याचे निर्देश जारी केले आहेत.त्यामुळे अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच पळापळ झाली आहे.
वसई-विरार पालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पालिकेचे सर्व नियम ढाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. परंतु संबंधित सहा. आयुक्तांकडून कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने बांधकाम माफियांनी आपली बांधकामे बिनदिक्कत पणे सुरू ठेवली होती.
याबाबत पालिका दरबारी दररोज हजारो
तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे
मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्तांनी सर्व सहा. आयुक्तांना
आपापल्या प्रभागात सध्या सुरू असलेल्या तसेच नुकतेच पूर्ण झालेल्या अनधिकृत बांधकामांना एम.आर.टी.पी कायद्यांनुसार २४ तासात सदरचे बांधकाम निष्कासित करण्याची नोटीस देऊन निष्कासनाच्या दृष्टीने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या कारवाईचा अहवाल पालिका मुख्यालयात एका आठवड्यात यादीसह सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान या आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूर केल्यास प्रभागातील अनधिकृत बांधकामांना अभय दिल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबीही पाटील यांनी दिली आहे.
पेल्हार प्रभाग सर्वाधिक चर्चेत-
वसई विरार पालिकेच्या ९ प्रभागापैकी असलेला पेल्हार प्रभाग सद्या अनधिकृत बांधकामांचा केंद्रबिंदू बनला आहे. या प्रभागातअनेक ठिकाणी बिनदिक्कत पणे अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत.या प्रभागात बिनदिक्कत सुरू असलेली अनधिकृत बांधकामे दिवसेंदिवस प्रशासनाची डोकेदुखी ठरत असतानाही
याकडे संबंधित सहा.आयुक्त जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.परिणामी पेल्हार प्रभागात अनधिकृत बांधकामांचा आलेख वाढताना दिसत आहे.वास्तविक या प्रभागात अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी पालिकेने विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु गेल्या १० वर्षात याठिकाणच्या अनधिकृत बांधकामांविरोधात कोणतेच ठोस अवलंबले नाही. परिणामी आज या प्रभागात जागोजागी अनधिकृत बांधकामे उभी राहताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या अनधिकृत बांधकामांना पालिका अधिकाऱ्यांचेच अभय लाभत आहे. त्यामुळे कितीही तक्रारी करूनही कोणतीच कारवाई पालिका अधिकारी करण्यात स्वरस्य दाखवत नसल्याचे दिसून येते.
