

धडाडीचे पोलीस उपनिरीक्षक श्री. हितेंद्र मनोहर विचारे यांची पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर आस्थापनेवरून, वसई विरार मीरा भाईंदर आयुक्तालयाच्या आस्थापनेवर बदली करण्यात आली आहे. श्री. विचारे पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात वेल्फेअर विभागात नियुक्तीवर होते.
त्यांचा अनुभव ध्यानात घेता त्यांची गुन्हे शाखेत परत वर्णी लावण्यात आलेली असून त्यांची नेमणूक गुन्हे शाखा युनिट ०१ येथे करण्यात आलेली आहे. दिनांक ३० जानेवारी पासून त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला आहे.
पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वेल्फेअर विभागात कार्यरत असण्याअगोदर साधारण दीड दोन वर्षापूर्वी श्री. हितेंद्र विचारे स्था.गु.शा. नालासोपारा युनिट येथे कार्यरत होते.
विचारे यांनी मुंबई क्राईम ब्रँच येथे आपल्या उमेदीचा काळ व्यतीत केला. नव्वदच्या दशकात मुंबईमध्ये संघटित गुन्हेगारीने आणि गॅंगवॉरने डोके वर काढलेले असताना तत्कालीन आयुक्त सत्यपाल सिंग यांनी स्थापन केलेल्या एन्काऊंटर स्कॉड मध्ये विचारे यांचा समावेश होता.
नालासोपारा स्था.गु.शा. युनिटचा दबदबा
तत्कालीन पालघर पोलीस अधीक्षक श्री मंजुनाथ सिंगे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली, पो.नि. जितेंद्र वनकोटी आणि पो.उ.नी. श्री हितेंद्र विचारे ह्या दोन अधिकाऱ्यांच्या धडाडी आणि अनुभवाच्या जोरावर नालासोपारा स्था.गु.शा. युनिटने संपूर्ण तालुक्यात आपला जबरदस्त दबदबा कायम केला होता.
या दुकलीच्या कार्यकाळात खंडणीखोर आरटीआय कार्यकर्त्यांवर तब्बल २१ खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात पालघर पोलिसांना यश आले त्याच बरोबर जबरदस्त नेटवर्कच्या जोरावर अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्या गुटखा माफियांचे कंबरडे पार मोडून टाकण्यात पालघर पोलिसांना यश प्राप्त झाले होते.
अतिरिक्त पोलीस आयुक्त राजतीलक रोशन यांची अभिनव संकल्पना
युनिट नं ३६३ ची स्थापना
तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी लहान मुलांचे अपहरण आणि मिसिंगची प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी एक अभिनव संकल्पना राबवली होती. या कामाकरिता विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येऊन त्याला ३६३ युनिट असे नाव देण्यात आलेले होते. आणि या ३६३ युनिटच्या नेतृत्वाची धुरा पो.उ.नि. हितेंद्र विचारे यांच्याकडे देण्यात आलेली होती.
३६३ युनिटने मिसिंग केसच्या अनेक प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी बजावली आणि त्या तपासातून खुनासारखे भयंकर गुन्हे देखील उघडकीस आले होते.
पिटा ऍक्ट खाली आंतरराज्यीय टोळीवर कारवाई
नालासोपारा स्था.गु.शा. येथे कार्यरत असताना पो. उ. नि. विचारे आणि त्यांच्या झुंजार सहकाऱ्यांनी, महिला आणि लहान मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात धकलणाऱ्या आणि त्यांना अनैतिक देह व्यापार करण्यास भाग पडून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला.
या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन थेट बांगलादेश सीमेपर्यंत पाठलाग करून प्रमुख आरोपी जेरबंद केले होते तर देह व्यापार करणारे पुण्याचे मोठे रॅकेट सुद्धा उद्धवस्त करण्यात यश आले होते.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन श्री विचारे यांचा गौरव देखील करण्यात आलेला होता