

वसई,( मनिष म्हात्रे ): लग्न म्हटले की, जवळ पैसा असो वा नसो पैपाहुण्यांना आहेर, मान्यवरांना फेटे आणि डॉल्बीचा दणदणाट असा काहींसा माहोल असतो. जाऊळ, वास्तूशांती सारख्या कार्यक्रमातसुद्धा केवळ प्रसिद्धीसाठी वारेमाप खर्च करणारी मंडळी मोठ्या संख्येने आढळतात.मात्र वसईतील एका पित्याने मुलीचा लग्नसोहळ्यात आलेल्या अहेरात पदरच्या आणखी पैशांची भर टाकत रूग्णालयाला आर्थीक मदत करत एक वेगळाच आदर्श लोकांपूढे ठेवला आहे.
वसईतील ख्रिस्ती बांधवांच्या लग्नसोहळे देखील मोठ्या थाटात पारंपारिक पद्धतीने साजरे होत असतात. कोणत्या गोष्टींवर कोणी? किती? आणि कसा? खर्च करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी ज्यावर आपण खर्च करणार आहे असा कोणताही कार्यक्रम पुढील आयुष्यासाठी आठवणीतून प्रेरणादायी ठरावा यासाठी वसईतील वाघोली गावातील पीटर फर्नांडिस यांनी एक वेगळाच आदर्श लोकांपूढे ठेवला आहे. तानिया या त्यांच्या मुलीचे माणिकपूर येथील मार्क डाबरे सोबत लग्न सोहळा आप्तस्वकीयांच्या उपस्थीतीत रविवारी पार पडला.लग्नानंतर आलेल्या अहेराची पाकिटे फोडली असता तब्बल पाच लाख रूपये अहेर तानियाला भेटीदाखल आला होता.पिटर फर्नांडिस सामाजीक कार्यात नेहमीच पूढे असून त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे.त्यामूळे मुलीच्या लग्नात आलेल्या पाच लाख अहेर समाज कल्याणासाठी वापरण्याचा निर्णय कूटूंबातील सदस्यांनी घेतला.त्याचप्रमाणे पिटर यांनी आपल्याकडील आणखीन सहा लाख रूपये असे अहेरातील पैशात भर टाकत अकरा लाख रूपयांचा धनादेश मुलीच्या लग्नप्रीत्यर्थ वसईतील कार्डीनल ग्रेशियस रूग्णालयाला मदतीसाठी दिला.यावेळी पिटर फर्नांडिस,मोनिका फर्नांडिस,फादर अंब्रोज फर्नांडिस,तानिया फर्नांडिस – डाबरे,मार्क डाबरे, कार्डीनल ग्रेशियस रूग्णालयाचे चेअयमन अॅन्सन परेरा, थाॅमस ब्रिटो, युरी घोन्सालवीस आदि मान्यवर उपस्थित होते.