
वसई : (प्रतिनिधी) : माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच हॅण्डपर्स जबरी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सदर गुन्ह्यांतील गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी खास पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने केलेल्या तपासाला योग्य दिशा मिळाल्याने तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. अबुझर रियासत जाफरी (वय 50) रा: वासिंद, ता.शहापूर, जि.ठाणे), अनुराग भुषण रांगणेकर (वय 24) रा: वसई पश्चिम, विवेक महेश खेरालीया (वय 26) रा: ओमनगर, वसई (पश्चिम) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी याआधी केलेल्या गुन्ह्यांची कबुलीदेखील पोलिसांना दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी सुमारे 1 लाख 56 हजार रूपये किंमतीची 52 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व सोन्याचे मंगळसूत्र, 80 हजार रूपये किंमतीचे दोन अॅप्पल कंपनीचे आयफोन व 6 एस मोबाईल, 10 हजार रूपये किंमतीचा यामाहा कंपनीचा मोटार सिल्व्हर व लाल रंगाची एफ.झेड सायकल असा एकूण 2 लाख 68 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यातील आरोपी अबुझर रियासत जाफरी, अनुराग रांगणेकर, विवेक खेरालीया यांनी सोनसाखळी आणि हॅण्डपर्स चोरीच्या गुन्ह्यांची कबुली माणिकपूर पोलिसांना दिली. अबुझर याने माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 3 गुन्हे केले असून त्याच्यावर भादंविक 392, 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. तसेच अनुराग रांगणेकर आणि विवेक खेरालीया यांच्यावरदेखील माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी आणि हॅण्डपर्स चोरीप्रकरणी भादंविक 392, 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन फलफले, पोलिस उपनिरीक्षक रेखा पाटील, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बी.एस.बांदल, पोलिस नाईक निरज शुक्ला, कपिल नेमाडे, शैलेश पाटील, अशोक वळवी, भालचंद्र बागूल, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश गोडगे यांनी केली.