
वसई ,मनिष म्हात्रे : पालघर जिल्ह्यातील जवळपास 450 हून अधिक अपंग, मूक-बधिर व शारीरीक व्यंग असलेली मुले- मुली,महिला-पुरूष त्याचप्रमाणे आश्रमशाळेतील शिक्षण घेणारी मुलं यांचा संयुक्त स्नेहमेळावा वसईतील अभंग सेवा समिती व माफि सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून रविवारी वसई पश्चिम वाघोली गावात भरविण्यात आला होता. ‘पिटर द रॉक’ या ठिकाणी भरविण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात अभंग सेवा समिती चे फादर मायकल जी, अपंग सेवा समितीच्या सिंथिया बाप्तिस्टा,माफी ट्रस्टचे पीटर फर्नांडिस, मोनिका फर्नांडिस,फिनिक्स फाऊंडेशनचे संतोष संसारे, निदानचे डॉ. नितीन थोरवे , बॅसीन कॅथॉलिक बॅकेचे पायस मच्याडो,लाॅरेल डायस, फा.एलायस राॅड्रीक्ज, फा.बाप्तीस लोपीस आदी मान्यवर उपस्थित होते.
14 फेब्रुवारी हा दिवस प्रियजनांचा दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असतो. मात्र वसईतील अभंग सेवा समिती व माफी ट्रस्टच्या माध्यमातून हा दिवस अपंगांसह साजरा करण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले होते. त्याला वसईतून मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी नऊ वाजता वाघोली नाक्यावरून बँडच्या तालावर मिरवणुकीने या अपंगांना मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यात आले. वसई तालुका व तालुक्याबाहेरील जवळपास 450 हून अधिक शारीरीक व्य॔ग असलेल्या मुल-मुली, स्री-पूरूष यांना या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून आणण्यात आले होते. विशेष म्हणजे या स्नेहमेळाव्यात हिंदू- ख्रिश्चन व मुस्लीम पद्धतीने एकत्रीत प्रार्थना म्हणत या मेळाव्याला सुरूवात करण्यात आली होती.दिवसभरात अनेक करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले होते.यात धमाल-मस्ती व खेळाच्या माध्यमातून या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न केला गेला.नाच-गाणे, कला-क्रिडांचा मनसोक्त आनंद या मेळाव्यात प्रत्येकाने घेतल्याचे दिसून येत होते. दुपारच्या सत्रात फिनिक्स फाऊंडेशनचे संतोष संसारे यांनी दिव्यांग ट्रॅकिंग या उपक्रमाबद्दल दृकश्राव्य माहिती उपस्थितांना दिली.माफी ट्रस्टचे पिटर फर्नांडिस यांनी आपल्या मुलीच्या लग्नप्रित्यर्थी पालघर जिल्हातील सर्व जाती धर्मातील शारीरीक व्यंग असलेल्यांसाठी एक दिवसीय स्नेहमेळावा आयोजीत केला होता.या सर्वांना सकाळचा नाश्ता, जेवण ,भेटवस्तू देण्यात आले.