


वसई दि.20 (वार्ताहर) : वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे अनेक भागात विकासकामे सुरू आहेत.मात्र,पालिकेतील अभियंते.स्थानिक नगरसेवक अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार निकृष्ट काम करून मलई लाटण्याचा प्रकार करीत आहेत. प्रभाग समिती आय वॉर्ड क्र 103 मध्ये असाच काहीसा प्रकार सुरू असून महापालिकेतर्फे योग्य रितीने काम करण्याची ताकीदवजा नोटीस बजावूनही ठेकेदाराने कामात सुधारणा न करता काम सुरूच ठेवले आहे..वसई विरार शहर महापालिका पभाग आय हद्दीत वॉर्ड क्र.103 गिरीज तलाव भागात पाईप गटार बांधण्याचे काम मे.एम.ई.प्रो.प्रा.लि. कंपनीतर्फे सुरू आहे.पाईप टाकताना पी.सी.सी. करणे गरजेचे असतानाही ठेकेदार कंपनी तसेच पाईप टाकत आहेत.पाईप लेव्हलमध्ये नसून वर-खाली असे आहेत.सदरबाब भाजप अल्पसंख्यांक आघाडी वसई विरार जिल्हा सरचिटणीस सॅमसन आल्मेडा यांच्या निदर्शनास येताच तयांनी ठेकेदारास जाब विचारून काम थांबविण्यास सांगितले.मात्र, ठेकेदाराने न जुमानता काम सुरूच ठेवले.त्यामुळे सॅमसन आल्मेडा यांनी महापालिका आय प्रभाग समिती कार्यालयात तक्रार केली.सदर तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक अभियंत्याने ठेेकेदार कंपनीस नोटीस बजावून सदरचे काम अंदाजपत्रकीय तरतुदीनुुुसार तसेच करारनामा अटी व शर्तीनूसार कामात सुधारणा करून काम योग्य रितीने करून तसा छायाचित्रांसकट अहवाल कार्यालयात सादर करावा.अन्यथा आपले देयक अदा केले जाणार नाही,असा इशारा दिला आहे.तरीही ठेकेदार मात्र नोटिशीला न जुमानता निकृष्ट काम करतच आहे.त्याच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचा आरोप सॅमसन आल्मेडायांनी करून या निकृष्ट पाईप गटारसंबंधात वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याचे सांगितले.