
पालघर जिल्ह्यात शिक्षण विभागाचा मनमानी कारभार

वसई(प्रतिनिधी)-देशासह राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.पालघर जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत.असे असताना शिक्षण विभागाने
शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत मुलांचे
सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्ह्यातील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविकांना दिले आहेत.प्राचार्या तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.)लता सानप व शिक्षणाधिकारी (माध्य) संगिता भागवत यांनी हे आदेश जारी केले असून दि .१ ते १० मार्च २०२१ या कालावधीत प्रत्येक शाळेने ही मोहीम राबविण्याचे बंधनकारक केले आहे.विशेष म्हणजे या सर्वेक्षण कार्यक्रमामुळे शिक्षकांच्या कामाचा व्याप आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा धोका पत्करून हे काम करावे लागणार आहे.दरम्यान शिक्षण विभागाच्या अशा भोंगळ व मनमानी कारभाराचा निषेध नोंदवत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या सर्वेक्षणा दरम्यान शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुनील डिसिल्वा यांनी शिक्षण विभागाला विचारला आहे.
या सर्वेक्षणात कोरोना काळात गजबजलेल्या वस्त्या,रेल्वे स्थानक,वीट भट्ट्या,मोठी बांधकामे,झोपड्या,चाळी,सिग्नल आणि विविध अस्थायी निवारे याठिकाणी शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.३ ते ६ वयोगटातील मुलांचा शोध घेण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना तर ६ ते १८ वयोगटातील मुलांचा शोध शिक्षकांवर सोपवण्यात आला आहे.त्यासाठी अ,ब,क,ड परिपत्रक त्यांना देण्यात आले असून त्यात नाव,गाव,पत्ता,जात नोंदवण्यात येत आहे.या शोधमोहीमेत आढळलेल्या बालकांची माहीती नोंदवण्यासाठी एक लिंक देण्यात आली असून या लिंक मध्ये शोध मोहीम करणारे सर्व प्रगणक यांनी वयोगट ६ ते १८ वर्ष असणाऱ्या मुलांची माहिती दि .१ ते १० मार्च २०२१ रोजी या कालावधीत नियमितपणे नोंदवाने क्रमप्राप्त आहे.तसेच या लिंक वर १०० % शाळांनी आपली माहीती नोंदवणे आवश्यक आहे.आदेशानुसार घरोघरी फिरण्यास शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी सुरवात केली आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांना कित्येक रहिवाशांनी परत पाठवलं आहे.शिवाय कोरोनाची दुसरी लाट वाढत चालली असल्याची माहिती असतानाही शिक्षण विभागाने ही मोहिम सुरु केल्यामुळे रुग्णाच्या संपर्कात येण्याची भिती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.तर शाळा बंद असल्याने नववी,दहावी,बारावी बोर्ड परिक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम,सराव परिक्षा,प्रॅक्टीकल,परिक्षेची पुर्व तयारी अंतीम टप्प्यात आली आहे.त्यामुळे शिक्षकांचे वेळापत्रक अगोदरच व्यस्त असताना या मोहिमेची जबाबदारी टाकण्यात आल्यामुळे शिक्षक वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
परिपत्रक काढून शिक्षकांना घरोघरी जाऊन जी माहिती घ्यायला सांगितली आहे ती ह्या कोरोनाच्या काळात अयोग्य आहे. एक ठिकाणी ५वी ते ८ वी च्या मुलांना मुलांना सुट्टी दिली जाते.आणि दुसऱ्या ठिकाणी शिक्षकांना वेठीस धरले जात आहे.शिक्षकांनी शाळेत ही यायचे,ऑनलाइन व्हिडिओ ही बनवायचे आणि पुन्हा घरोघरी जाऊन माहिती घ्यायची. त्यातच आता कोरोना चा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे.त्यामुळे शिक्षकांना कोरोना झाला तर त्यास कोण जबाबदार? इतर जिल्ह्यात हे काम थांबले आहे.मग पालघर जिल्ह्यातच हे काम का? त्वरित हे काम थांबवावे ही नम्र विनंती.
-सुनील जोसेफ डिसिल्वा(सामाजिक कार्यकर्ता)