
बारीपाड्याला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचे संवर्धन कौतुकास्पद
धुळे, दि. 6 (प्रतिनिधी) : तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वांगिण विकास हेच शासनाचे लक्ष असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केले.
महाडिबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान 2020-21 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी अवजारे वाटपाचा शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बारीपाडा येथे करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावीत, चैत्राम पवार, पंचायत समिती सभापती प्रतिभा सुर्यवंशी, सरपंच सुनिता बागुल, अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, , जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी.एम.सोनवणे, तालुका कृषी अधिकारी सि.के.ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, बारीपाड्याला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचे संवर्धन उत्तम प्रकारे करण्यात आले आहे. जुन्या बियाण्याचे जतन व संवर्धन करून चांगला उपक्रम राबविला आहे, हा उपक्रम अनुकरणीय असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी देशबंधु ॲग्रो रिसर्च कंपनीच्या आढावा बैठकीत कंपनीच्या कामकाजाचा मंत्री श्री.भुसे यांनी आढावा घेतला. सर्व सदस्यांशी संवाद साधत कंपनीच्या प्रगतीचा सर्व लेखाजोखा त्यांनी जाणून घेत त्यांच्या अडचणी व समस्याही त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. पिक कर्जापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देतांना, मत्सपालनासाठी स्थानिक आदिवासी शेतकरी बांधवांना प्राधान्य देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल ही संकल्पना यशस्वी ठरत आहे. शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाडिबीटीच्या अनुषंगाने आता प्रत्येक शेतकऱ्याला केवळ एक पानी अर्ज एकदाच सादर करावा लागणार असून विविध योजनेसाठी वारंवार अर्ज सादर करण्याची गरज यापुढे भासणार नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
प्रारंभी महाडिबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान 2020-21 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी अवजारे वाटपाचा कार्यक्रम मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते पार पडला. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा आज वाढदिवस असल्याचे औचित्य साधत आदिवासी महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर मंत्री श्री.भुसे यांनी शेतकरी सोमनाथ चौरे व मोतीराम पवार यांच्या शेतशिवाराची पहाणी केली. आदिवासी बांधवासोबत मंत्री श्री.भुसे यांनी जेवणाचाही आस्वाद घेतला. राज्याचे कृषी मंत्री त्यांच्या वाढदिवशी थेट आदिवासी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतशिवाराची पहाणी करत शासकीय योजनांचा लाभ देणाऱ्या मंत्र्याचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा यावेळी दिल्या.