आयुक्त गंगाथरण डी. यांना प्रदर्शनाच्या उदघाटनाचे आमंत्रण

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत बांधकामांना अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील हेच संरक्षण देत असल्याची चर्चा शहरात सुरू असून ते एका राजकिय पक्षासाठी झेड फंड वसूल करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.मनसेही पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून करत असून वसई विरार मध्ये सुमारे १५ लाख स्केवेर फुटाचे अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा केला आहे.परंतु पालिका प्रशासन या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी केवळ थातूर माथूर कारवाई करून कारवाईचा दिखावा करत आहे.दरम्यान पालिकेकडून कारवाईस चालढकल होत असल्याने मनसेने पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करुन पालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.दी.१३ मार्च रोजी हे चित्र प्रदर्शन वसई पूर्वेकडील ग्रीष्मा हॉल मध्ये आयोजित करण्यात आले आहे.
पालिका आयुक्त भेट नाकारत असल्याने मनसे व आयुक्त गंगाथरण डी. यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे.आयुक्तांनी वेळ द्यावा म्हणून मनसे ने तब्बल १६ पत्रे दिली होती. त्यामुळे संतप्त मनसे पदाधिकारी यांनी १७ वे पत्र आयुक्तांचा सत्कार करण्यासाठी लिहल्यावर कुठे भेटीसाठी आमंत्रित केले होते.या भेटीत मनसे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शहरातील समस्या मांडल्या होत्या. शिवाय अनधिकृत बांधकामांचा मुद्द्याही यावेळी उपस्थित करत या बांधकामांना अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील हेच पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट केले होते.शिवाय या बैठकीत मागण्या पूर्ण न झाल्यास मनसे पुन्हा आंदोलन करेल असे जाधव यांनी आयुक्तांना सांगितले होते.परंतु आज भेट घेऊन दीड महिना उलटला तरी अनधिकृत बांधकामांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. उलटपक्षी पालिका क्षेत्रात दुपटीने बांधकामे उभी राहू लागली आहेत. त्यामुळे मनसे ने या अनधिकृत बांधकामांचे चित्र प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रदर्शनात अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील हे मुख्य आकर्षण असणार असून त्यांच्या वसूलीचे कारनामे या चित्र प्रदर्शनातून जनतेला दाखवण्याचा प्रयत्न मनसे करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *