
येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राज्यातील गायक कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची मदत करणार

मुंबई दि.29 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले येत्या दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आपल्या एक महिन्याच्या वेतनातून राज्यातील आंबेडकरी कलावंतांना आर्थिक मदत करणार आहेत. कोरोनाचा कहर वाढत असताना लॉकडाऊन च्या काळात आंबेडकरी गायक कलावंतांची परिस्थिती हालाकीची झाली आहे.राज्यात अजून 15 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.या काळात आंबेडकरी गायक शाहीर लोककलावंतांना आर्थिक विवंचना आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील वर्षभरापासून आंबेडकरी कलावंतांना कोणतेही कार्यक्रम मिळालेले नाहीत.गत वर्षी कोरोना रोखण्यासाठी झालेल्या लॉक डाऊन मुळे आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंती चे जाहीर कार्यक्रम करण्यात आले नाही. यंदाही नेमका 14 एप्रिल आंबेडकर जयंती पासून राज्यात लॉक डाऊन लागला असल्याने आंबेडकरी कलावंतांना कार्यक्रम मिळालेले नाहीत.दोन्ही वर्षी आंबेडकरी कलावंतांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे आंबेडकरी गायक कलावंतांना येत्या दि.1 मे रोजी प्रत्येकी 5 हजार रुपये आर्थिक मदत ना.रामदास आठवले करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांना महिन्याला 2 लाख रुपये वेतन मिळत असून एक महिन्याचे वेतनाचे 2 लाख रुपये त्यांनी आंबेडकरी कलावंतांना मदत म्हणून वाटणार आहेत.