◆ भाजपचे अशोक शेळके यांची वसई तहसीलदारांच्या विरोधात निलंबनाची मागणी !

वसई(प्रतिनिधी)- वसई तालुक्यातील ससुनवघर या ठिकाणी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अशोक लेलॅण्ड कंपनी तसेच कोहिनूर कंपनीच्या मागील बाजूस खाडी पात्राच्या दिशेने प्रचंड मोठा माती भराव पाणथळ आणि कांदळवनाच्या क्षेत्रात करण्यात आलेला आहे.तसेच सध्या कोरोनाच्या काळातही या ठिकाणी प्रचंड मोठा माती भराव सुरू आहे. संबंधित क्षेत्र पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. शिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे या अतिसंवेदनशील नैसर्गिक क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी तहसीलदार वसई यांची आहे. ही बाब पूर्णपणे माहीत असतानासुद्धा तहसीलदार वसई यांनी या पाणथळ आणि कांदळवनाच्या क्षेत्रात बेकायदा माती भराव करणार्‍यांना अभय दिलेले आहे.दरम्यान या प्रकरणी वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीचे नेते अशोक शेळके यांनी विभागीय आयुक्त तसेच अध्यक्ष, पाणथळ जमीन तक्रार निवारण समिती कोकण भवन यांच्याकडे निलंबनाची कारवाई करण्याची तक्रार केलेली आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी बिनदिक्कत पणे मातीभराव सुरु असताना वसई तहसीलदार यांनी माती भराव करणार्‍यांशी संगनमत करून जुजबी परवानगी प्रकरणाची पूर्तता करून शासनाची आणि मुंबई उच्च न्यायालयाची ठरवून फसवणूक करून या ठिकाणी होणार्‍या पाणथळ क्षेत्राची, कांदळवनाच्या क्षेत्राची हानी केलेली आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार वसई यांच्याविरोधात या प्रकरणी विभागीय आयुक्त कोकण विभाग तसेच अध्यक्ष, पाणथळ जमीन तक्रार निवारण समिती यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे नेते अशोक शेेळके यांनी तातडीने निलंबन करून माती भराव करणार्‍यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान राज्य शासनाने या प्रकरणी उज्ज्वला भगत यांच्याविरोधात तातडीने कारवाई करण्याची भूमिका घेतली नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आणि मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची भूमिका घेतली जाईल, असे अशोक शेळके यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *