वसई, : तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात वसईतील झालेल्या नुकसानीचा आढावा आज पालघर लोकसभा क्षेत्राचे खासदार राजेंद्र गावीत यांनी घेतला.यात सत्पाळा येथील
दोन वृद्धाश्रम, नवापूर येथील बॅगलोर चाफ्यांच्या बागा तसेच अर्नाळा येथील मश्चीमारी बोटींच्या नुकसानीसंदर्भात अधिका-यांशी भेट घेऊन नुकसानग्रस्ताचे पंचनामे वेळेत करून त्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर कशी देता येईल याचा आढावा बैठकीत घेतला.
तोक्ते चक्रीवादळात वसईतील सत्पाळा जेलाडी येथील राजेश मोरो यांच्या न्यू लाईफ केअर फाऊंडेशन या वृद्धाश्रमाचे अतोनात नुकसान झाले असून ,या वृद्धाश्रमाला मोठ्या प्रमाणात मदतीचा हात विविध माध्यमातून सद्या देण्यात येत आहे. शुक्रवारी पालघर लोकसभा क्षेत्राचे खासदार राजेंद्र गावीत यांनी या वृद्धाश्रमाला भेट देत नुकसानीचा आढावा घेतला.तसेच येथील वृद्धांची आस्थेने विचारपूस केली.वृद्धाश्रमाचे वादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ,या वृद्धाश्रमाच्या डागडूगीसाठी दहा लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती खासदार गावीत यांनी यावेळी दिली.यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे वसई विधानसभा समन्वय हरिश्चंद्र पाटील, शिवसेना कार्यकर्ते पंकज देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार राजेंद्र गावीत यांनी वृद्धाश्रमाच्या आश्रयाला असलेल्या सर्व 29 वृद्धांची आपूलकीने विचारपूस केली.शिक्षिका सुमन रणदिवे यांचीही त्यांनी भेट घेतली.सुमन रणदिवे या बालमोहन विद्यामंदिराच्या निवृत्त शिक्षीका असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना एकेकाळी शिक्षणाचे धडे दिले होते.दोनच दिवसांपूर्वी रणदिवे बाईंनी प्रसारमाध्यमांमधून वृद्धाश्रमाला मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर विविध क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरू झाला होता. यात शिवसेना, मनसे तसेच एस डी फाऊंडेशन त्याचप्रमाणे जोगेश्वरी येथील बांद्रेकरवाडी मित्रमंडळाने मदतकार्य सुरू केले होते.
खासदार गावीत यांच्या वसई दौ-यात त्यांनी सत्पाळा येथील मदर तेरेसा होम या वृद्धाश्रमालाही भेट दिली.या वृद्धाश्रमाचेही तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे शेती बागायतीच्या नुकसानीचा आढावा त्यांनी घेतला.नवापूर,राजोडी येथील बॅगलोरी चाफ्यांचे झालेल्या नुकसानीची पहाणी त्यांनी केली.यावेळी कृषी अधिकारी तरूण वैती उपस्थीत होते.अर्नाळा येथील चार मश्चीमारी बोटींचे तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अर्नाळा फिशरमन सर्वोदय सहकारी सोसायटी लि.येथे मेरीटाईम बोर्डाचे पतन अभीयंता यांच्या अपस्थीतीत आढावा बैठक घेतली.तसेच अर्नाळा किल्ल्यात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहाणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *