
◆ धडक कामगार युनियनचे पालिका आयुक्तांना निवेदन
वसई : धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार व जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधरण डी. यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या सुख-सुविधां संदर्भात निवेदन देण्यात आले.
निवेदनाच्या माध्यमातून, मुख्य ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ म्हणजेच महापालिकेचे सफाई कर्मचारी यांना कोरोना महामारी सारख्या काळात मास्क तसेच सॅनिटाईजर, ग्लोस याचा दररोज पुरवठा पालिकेकडून होणे गरजेचे आहे. तसेच येणारा पावसाळा पाहता रेनकोट, गम बूट या सुख सुविधा तात्काळ मिळणे फार गरजेचे आहे.
कोरोनाच्या महामारी काळात आपल्या जीवाची पर्वा न करता हे सफाई कामगार अगदी मनापासून वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची काळजी घेत आहेत. कोरोनाला लांब ठेवण्यात याच कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. अशी महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या पालिकेच्या कामगारांना त्यांच्या हक्का पासून वंचित ठेवणे खेद जनक आहे.
तरी या निवेदनाच्या माध्यमातून तात्काळ सर्व कामगारांना दररोज मास्क, ग्लोस तसेच सॅनिटाईजर व बाकी सर्व सुख सुविधा लवकरात लवकर उपलब्ध द्याव्यात! अशी मागणी केली.