

वसई-पालघर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची राखरांगोळी करणाऱ्या आणि सर्वसामान्य पालकवर्ग तसेच शासनाची घोर फसवणूक करणाऱ्या संस्था चालकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करून अशा बोगस संस्था चालकांसह त्यांचे बस्तान बसेपर्यंत उघड्या डोळ्यांवर पट्टी लावून बसलेल्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फोजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आणि पालघर जिल्हा विदुयत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य अशोक गजानन शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे राज्याचे शालेयशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
पालघर जिल्ह्यातील १९० अनधिकृत शाळांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये वसई तालुक्यात सर्वाधिक १५० अनधिकृत शाळा आढळून आल्या. या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या विध्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये असे आवाहन पालघर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी जरी केले असले तरी तेवढ्यावर हा प्रश्न सुटणार नसून या अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून त्यांच्या पर्यायी शिक्षणासाठीच्या उपाययोजना कराव्यात असे मत अशोक शेळके यांनी व्यक्त केले आहे. अचानक या शाळा बंद झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवाह खंडित होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासनाची आहे. तेव्हा राज्य शासनाकडून या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करून देणे अपेक्षित आहे. मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळांचा बाजार भरला जातो व याकडे तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडून साधे लक्ष दिले जात नाही? हा प्रश्न संशय निर्माण करतो असेही अशोक शेळके यांनी म्हटले आहे.
वसई तालुक्यात सध्या शिक्षणाचे सर्रासपणे बाजारीकरण सुरु असून संस्था चालक बेकायदेशीरपणे शाळा उघडून शिक्षणाच्या नावाखाली सर्वसामान्य पालक वर्गाची व शासनाची लाखो रुपयांची लूट करीत आहेत. अशा संस्थाचालकांबरोबर त्यांना पाठीशी घालणाऱ्या शिक्षण विभागातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना कायद्याची जरब बसणे हे देखील तेवढेच गरजेचे असल्याचे मत अशोक शेळके यांनी व्यक्त केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, २००९ मधील कलम १८ (५) अन्वये सर्व अनधिकृत शाळा तात्काळ बंद करून या शाळा चालविणाऱ्या संस्था चालकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करावी त्याचप्रमाणे शासनाची आणि पालक,विद्यार्थी वर्गाची फसवणूक करून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी संस्था चालक आणि शिक्षण विभागातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फोजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी भाजपच्या अशोक शेळके यांनी राज्य शासनाकडे केली आहे.