
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातून गोळा केलेल्या कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे विलगीकरण करून असा कचरा क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) येथे नेण्यात येतो. कचरा गोळा करण्याचे काम जलदगतीने व सुरळीतपणे होणे तसेच कर्मचाऱ्यांना बीनमध्ये जमा केलेला कचरा वाहनात टाकताना होणारा त्रास विचारात घेऊन मा.आयुक्त यांनी नवीन स्वयंचलित बीन उचलणारी अत्याधुनिक टिपर वाहने खरेदी करणेबाबत निर्देशित केलेले होते. त्यानुसार वाहन विभागामार्फत ई-निविदा प्रक्रिया करून दिनांक २४/०६/२०२१ रोजी ५० नग टिपर वाहने खरेदी करून घनकचरा विभागात दाखल झालेली आहेत. या वाहनांचे परीक्षण मा.आयुक्त श्री. गंगाथरन डी. यांनी स्वत: केले.
यापूर्वी वाहनात टाकण्यात येणारा कचरा कर्मचाऱ्यांना कचऱ्याचे बीन उचलून टाकावा लागत होता. परंतु या नवीन खरेदी केलेल्या वाहनांचे वैशिष्ट्य म्हणजे वाहनांमध्ये बीन लिफ्टरची व्यवस्था केलेली असल्यामुळे कर्मचाऱ्यांना कचऱ्याने भरलेले वजनदार बीन उचलून वाहनात खाली करण्याचे श्रम करावे लागणार नाही. तसेच पूर्वी कचऱ्याचे बीन हाताळताना बीन तुटण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. अत्याधुनिक बीन लिफ्टरमुळे बीन तुटण्याचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच या टिपर वाहनांचा आकार कमी असल्याने सदर वाहन कमीत कमी जागेच्या ठिकाणी जाऊन शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून कचरा गोळा करणे सहज शक्य होणार आहे. यामुळे निश्चितच शहर स्वच्छ ठेवणेस मदत होणार आहे.