
एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली करून अनधिकृत बांधकाम धारकांचे केलं उदात्तीकरण. यामागील षठयंत्र काय ?….विनायक खर्डे (स्वराज्य मावळा प्रतिष्ठान)
वसई-विरार : पेल्हार विभागाचे सह आयुक्त मोहन संखे यांनी पेल्हार प्रभाग कार्यालया लगतच्या इमारतीवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली. वरिष्ठांची मर्जी न राखल्याने बदलीची नामुष्की पत्करावी लागली. या प्रवृत्तीने अनधिकृत बांधकाम धारकांचे आणखीनच फावले जाते व मोठया मदमस्त हत्तीप्रमाणे आपले बस्तान बसवण्यास तेज तर्रार होऊन अधिकारी,पत्रकार कोणालाही जुमानत नाहीत. यामुळेच या प्रभागात पैश्याच्या जोरावर पत्रकारांना मारहाणीचे प्रकार वाढीस लागले आहेत. पेल्हार (नालासोपारा फाटा) पोलिस यंत्रणा यामध्ये बघ्याची भूमिका बजावत सर्व खापर मनपावर फोडून भर संचारबंदी मध्ये जोमाने अनधिकृत बांधकामांना अप्रत्यक्षपणे खतपाणी घालत होते. पेल्हार प्रभागात गेल्या दोन वर्षांत दोन लाख स्क्वेअर फूटापेक्षा जास्त बांधकामे झाली असतील. या प्रभागातील सर्वाधिक बांधकाम चौधरी कंपाउंड येथे तर रिचर्ड कंपाउंड, जाबरपाडा व पालिका परिसरात झाली पण या सर्वाना मंत्रालयातील काही मातब्बर व्यक्तीचा वरदहस्त असल्याचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील स्वतः कबुल करतात व मोहन संखे यांच्या व्हायरल व्हिडीओ मध्ये ते स्पष्टपणे दिसून येते. न डगमगता परखडपणे उघड बोलण्याचे धाडस मोहन संखे यांनी दाखवले. या संचारबंदी काळात मोहन संखे आरोग्य विभागात काम करताना स्वतःला झोकून दिले असता तत्कालीन ठेका अभियंता अनधिकृत बांधकाम धरकाशी अर्थपूर्ण संबध वाढवण्याचे काम करत असल्याने एकही MRTP नोटीस न बजावता नेमकं कोणतं काम करत होते? हे लोकल न्यूज पेपर सातत्याने मांडत असतांना वरीष्ठ आधिकारी डोळयांना पट्टी बांधून धुर्तराष्ट्राची भूमिका बजावन्याचे काम करत होते का? यांची रोजनिशी ची चौकशी होणे गरजेचे आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या मनमानी कारभाराला अजुन किती अधिकारी बळी पडतील हे काळच ठरवेल.
आज वसई विरार शहर मनपाचे अनधिकृत बांधकामामुळे कधी राजेंद्र पाटील, राजेश घरत, प्रदीप आवडेकर, दीपाली ठाकूर, नीता कोरे व आता मोहन संखे असे अधिकारी गेल्या तीन वर्षांत बदलले गेलेत. वास्तविक पाहता प्रत्येक महानगरपालिका म्हणजे सत्ताधारी पक्षाचे भ्रष्ट्राचारांचे कुरण आहेत. त्यात वसई विरार शहर मनपाचे घोटाळे आणि अनधिकृत बांधकामवर बक्कल पैसे मिळवण्याचे ठिकाण म्हणून पाहिले जाते. आता नवीन आलेले आयुक्त हाताखाली ५ अधिकारी असूनही किती विकास कामांना गती आली यावर प्रश्नचिन्ह उभी राहतात?
आज मोहन संखे यांना पदावरून हटवण्यात आले उद्या दुसऱ्याला बळीचा बकरा बनवला जाईल. पण जे वरिष्ठअधिकारी याला जबाबदार आहेत ते आपला मोबाईल बंद करून काहीच न झाल्याचा भाव आणतात व माझं कोणी नाव घेतले तर त्या अभियंता किंवा अधिकाऱ्यांचे तोंड फोडण्याची भाषा करतात. अशा निष्क्रिय भ्रष्ट्राचारी व बेजबाबदार वरिष्ठ आधीकाऱ्याची तत्काल चौकशी करुन शिस्तभंगाची करवाई करण्यात यावी जेणेकरून बांधकाम धारकाशी संधान बांधताना अभियंता किंवा कनिष्ठ अधिकारी लाचार होणार नाहीत.