
मालाड दि. ११ : येथील जनसेवा समिति संचालित श्री. एम. डी शाह महिला महाविद्यालयाने कोरोनाच्या या भय काळात विद्यार्थिनी, पालक व समाज यांना प्रबोधन, मार्गदर्शन व वैद्यकीय तसेच अन्नधान्य देण्याच्या हेतूने ‘मिशन होप’ या उपक्रमाची निर्मिती केली आहे. या “मिशन होप” उपक्रमाअंतर्गत विशेष व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. आजचे व्याख्यानमालेचे सहावे पुष्प होते. यासाठी आज कर्नाटक महिला विद्यापीठ विजयापूर कर्नाटक मधील कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर आणि कुपर हॉस्पिटल मधील निवृत प्रा. डॉ जी. एस. हाथी यांना आमंत्रित केले होते.
या व्याख्यानमालेत बोलताना डॉ. मीना चंदावरकर म्हणाल्या की, कोरोनाचा हा काळ आपल्या समोर एक जागतिक आव्हान म्हणून समोर आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, शासकीय नियमांचे पालन व संयमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाउनमुळे अनेकांचे जीवन ठप्प झाले, कामधंदे बुडाले, अनेकांच्या कुटुंबातील प्रियजन सोडून गेले, शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जीवनात नैराश्य आले. अशा या पडत्या काळात श्री. एम. डी. शाह महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा शर्मा व त्यांचे सहकारी यांनी ‘मिशन होप’ च्या माध्यमातून जे कार्य केले ते अतिशय कौतुकास्पद आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा शर्मा यांचा दृष्टिकोन, त्यांचा आत्मविश्वास आणि विद्यार्थिनी व समाजाप्रती त्यांची असलेली संवेदनशिलता आणि त्यामधून त्यांनी बजावलेली भूमिका अतिशय महत्वाची आहे. या ‘मिशन होप’ च्या माध्यमातून तज्ञ मार्गदर्शनाबरोबरच गरजूंना अन्नधान्याची मदत ही केली जात आहे. हे एक समाजसेवेचे व्रतच आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘वर्क फ्रॉम होम’ या पद्धतीने काम करत असताना विशेषत: महिलांची कसरत होत आहे. घर व काम आणि कर्तव्य व जबाबदारी यामध्ये तिला बॅलेन्स साधावा लागत आहे. कुटुंबाचे संरक्षण करताना रोग प्रतिकारक शक्ति वाढवणे अतिशय महत्वाचे आहे. भारतीय परंपरेत आयुर्वेदाला खूप महत्व आहे. आपल्या स्वयंपाक घरातच अनेक औषधांचा साठा असतो त्याचा वापर केल्यास रोगप्रतिकारक शक्ति वाढू शकते. तसेच आजच्या काळात योगा, प्राणायाम, ध्यानसाधना हे करणे देखील आवश्यक आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांकडे पुष्कळ वेळ आहे, याचा उपयोग स्वत:चे छंद जोपासण्यासाठी, घरातील स्वछता व टापटीपपणा ठेवण्यासाठी व कुटुंबात मिसळण्यासाठी केला पाहजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
वेबिनारचे दुसरे वक्ते कुपर हॉस्पिटल मधील निवृत प्रा. डॉ. जी. एस. हाथी यांनी कोरोना व कोरोना काळात घ्यावयाची काळजी याबद्दल विस्तृत माहिती दिली. कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर मास्क वापरणे, साबनाने हात धुणे आणि समूहात न मिसळणे या शासनाच्या नियमाचे पालन केले पाहिजे. कोरोना लवकर जाणार नाही पण त्याला नियंत्रणात आणता येते. मलेरिया, टिबी, एच.आय.व्ही हे आजार गेले नाहीत पण ते नियंत्रणात आणले म्हणूनच कोरोनाला नियंत्रणात आणायचे असेल व कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सतर्कता व सावधानता बाळगली पाहिजे.
या प्रसंगी त्यांनी कोरोनाची लक्षणे, त्यावरील टेस्ट, वॅक्सीनेशन यावर तपशीलवार माहिती दिली . लहान मुलांना कोरोना पासून दूर ठेवायचे असेल तर मोठ्या व्यक्तीने मास्क वापरणे आवश्यक आहे. कुटुंबियांची काळजी घेताना ऑक्सिजन पातळी, ताप हे वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे. या वेबिनारमध्ये जनसेवा समितीच्या संचालिका डॉ. रंजनबेन माणियार म्हणाल्या की, कोरोनाला घाबरू नका नियमांचे पालन करा असा त्यांनी संदेश दिला.
वेबिनार मध्ये जनसेवा समितीचे अध्यक्ष डॉ. मोहनभाई पटेल हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, कॉलेजने चालविलेला ‘मिशन होप’ हा उपक्रम अतिशय सुंदर व प्रेरणादायी आहे. या उपक्रमामुळे समाज विकासात, सामाजिक क्षेत्रात बदल घडविण्यास मदतच होत आहे. विद्यार्थिनी व पालक यांना मार्गदर्शन व प्रबोधनाबरोबरच अन्नधान्य व आर्थिक मदत केल्यामुळे त्यांच्या जीवनात एक आशेचा किरण आलेला आहे. कोरोनामुळे जरी नुकसान झाले असले तरी भविष्यात माणसाने कसे राहावे हे देखील सुचविले आहे. कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने जबाबदरीने वागवेच त्याचबरोबर शारीरिक व मानसिक दृष्ट्याही सक्षम असणे आवश्यक आहे. वादळे येतात आणि जातात पण त्याचा संयमाने सामना करावा लागतो. तसे प्रश्न, समस्या येतच राहणार पण त्याला आत्मविश्वासाने सामोरे जाणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्या डॉ. दीपा शर्मा यांनी पाहुण्यांचे स्वागत करून ‘मिशन होपची’ संकल्पना स्पष्ट केली. विद्यार्थिनी, पालक, समाज व महाविद्यालय यांना एकत्र जोडण्याचे काम ‘मिशन होपकडून’ केले जात आहे. आजवर केलेल्या कामाचा अनुभव हा अदभूत होता. सर्वांच्या जीवनात नैराश्य दूर करून आनंद निर्माण करण्यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन, दररोज योगा, प्राणायाम व देणगीच्या माध्यमातून गरजूंना मदत यामुळे सामाजिक कार्यात भरच पडत आहे. हा वेबिनार जवळ जवळ सतरा देशामध्ये पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
या सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. जयश्री मेहता व प्रा. झरीन रॉबर्ट्स यांनी मानले. या प्रसंगी संस्थेचे संचालक मोहनलाल शाह व उपप्रचार्या प्रा. शुभा आचार्या , पर्यवेक्षक प्रा. किशोर गुप्ते व प्रा. पराग ठक्कर हे मान्यवर उपस्थित होते.
