
नालासोपारा :- सदनिकेच्या नावावर अनेक नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना सदनिका देत फसवणूक केल्याची घटना नालासोपारा शहरात घडली होती. त्यावेळी नालासोपारा पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या फरार आरोपीला पोलिसांच्या टीमने तब्बल दोन महिन्यांनी यूपीत जाऊन त्याला ताब्यात घेत अटक केले आहे.
मुंबईच्या मालाड येथील जय अंबे सोसायटीत राहणाऱ्या रवींद्र यादव (33) आणि साक्षीदारांना 30 डिसेंबर 2020 ते 12 फेब्रुवारी 2021 यादरम्यान नालासोपारा शहरात सदनिका देतो असे सांगितले. त्याबदल्यात पश्चिमेकडील सत्यम शॉपिंग सेंटरमधील शॉप नंबर 227 मध्ये आरोपी बांधकाम व्यावसायिक आशिष सिंग याने यांच्याकडून 27 लाख 50 हजार रुपये घेतले होते. त्यांना सदनिका न देता व घेतलेले पैसे न देता फसवणूक केली होती. नालासोपारा पोलिसांनी 24 एप्रिलला आरोपी विरोधात तक्रार आल्यावर गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता व फसवणूक झालेले नागरिक पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत होते. पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाल्यावर तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे, पोलीस नाईक आदिनाथ कदम हे उत्तर प्रदेशात आरोपीला पकडण्यासाठी गेले. आरोपीला जोनपूर जिल्ह्यातील सिटूपूर या गावांतून 26 जूनला पकडून नालासोपारा पोलीस ठाण्यात घेऊन आले. या आरोपींने अनेक गोरगरीब नागरिकांना सदनिकेच्या नावावर फसवणूक केल्याचे सूत्रांकडून कळते.
1) फरार आरोपीला यूपीतून तपास अधिकाऱ्याने पकडून आणले आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. किती नागरिकांना याने फसवले आहे याचा तपास करत आहे. ज्यांची आरोपीने फसवणूक केली आहे त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. – वसंत लब्दे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)